तो आला आणि त्याने विकेट काढली - आनंद बापट (मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२०)

„तो आला आणि त्याने विकेट काढली“ असे म्हटले तर कपिल देव, शेन वॉर्न, होल्डिंग, गार्नर ही नावे आठवणार नाहीत सध्या. डोळ्यासमोर येणार तो काटय़ांनी युक्त एक चेंडू म्हणजे कोविड-१९ किंवा कोरोना विषाणू .

कोरोना हे नाव जेव्हा ऐकले तेव्हा पटकन डोळ्यासमोर करोना हवाई चप्पल आली. लहानपणी याची जाहिरात दूरचित्रवाणीवर पाहिल्याची अंधुक आठवण झाली. मार्च २०२० नंतर त्या नावाचे असे झंझावात आले की त्याच्याबरोबर सगळे घेऊन गेले. आठ ते दहा दिवसात सगळे कसे शांत झाले. „कोरोना आला कोरोना आला“ या घोषणेत तीच भयानकता होती जी शोलेच्या गब्बरसिंग मध्ये होती. तर अशा या कोरोनाची ओळख धूमधडाक्यात झाली. बेसावधपणे एखाद्या बलाढ्य शत्रूने हल्ला केला होता जगावर. युद्धासाठी कोणीच तयार नव्हते. जशी देशोदेशीची सत्ता केंद्रे तयार नव्हती तशीच घरात पण काही तयारी नव्हती. जर्मनीमध्ये विचार करण्याची पद्धत वेगळी असल्यामुळे एक विश्वास होता की इथे युद्ध शास्त्रीय आधारावरच होणार. उगाच गडबड गोंधळ नसणार. जिथे दुखते तिथे औषध आणि अगदी पाहिजे तेवढेच. तसेच झाल्यामुळे आज चांगली स्थिती आहे इथे. तर असो.

एकदम होम ऑफिस सुरू झाली, शाळा घरातून सुरू झाल्या. फक्त ग्रोसरीची सुपरमार्केट्स ओपन होती आणि बाकी सगळे बंद. तिथे पण बंधने आली. मास्क, सॅनिटायझर, माणसांमध्ये अंतर इत्यादी इत्यादी. आधीच सध्याच्या युगात माणसे एकमेकांपासून दूर जात आहेत त्यात या कोरोनाने त्या समाजमनाला वारा घातला. एकूण एकदम गोंधळ उडाला. सगळ्यात आधी पोटाची सोय. त्यामुळे इंडियन स्टोअरमध्ये जाऊन महिनाभर पुरेल एवढी खाद्यसामुग्री आणली. मग लक्षात आले की टॉयलेट पेपर गायब होत आहेत. चार ठिकाणी जाऊन कसे तरी ते पण जमवले. एकदा पोटाची आणि पोट रिकामे करण्याची साधने आली घरात कि मग मेंदू शांत झाला.

आता एक पोकळी निर्माण झाल्यासारखी वाटू लागली. घरी बसून करायचे काय हा प्रश्न पडायला लागला. इतके दिवस कधी मी घरी बसलो नव्हतो. गेल्या अनेक वर्षांमध्ये कार्यालयाच्या कामानिमित्त अनेक ग्राहक भेटी झाल्या. परदेश दौरे, स्थानिक दौरे झाले. घरी असलो तरी दूरभाषयंत्रावर चर्चा चालूच असायच्या. एकदम कोरोनामुळे सगळी कार्य स्थगित झाली आणि समोर पोकळी दिसायला लागली. पण ह्या काळात असे काही मजेदार किस्से घडले जे इथे नमूद केल्याशिवाय मला थांबता येणार नाही.

एकदा मी आणि बायको संध्याकाळी खरे तर रात्रीच, दहानंतर जरा पाय मोकळे करायला निघालो होतो. थंडी होती त्यामुळे जॅकेट, स्कार्फ मास्क आणि कॅप घातली होती. चालत असताना एका झाडाखाली मला प्रसाद मिळाला. इतक्या रात्री कसे काय म्हणून मी वर बघितले. अर्थातच अंधार असल्यामुळे काही पक्षी वगैरे दिसला नाही. काय करू हा विचार आला आणि माझ्या लक्षात आले की माझ्याकडे टेम्पो(जर्मन लोकांचे नाक शिंकरण्याचे साधन) आहेत. मी खिशातून टेम्पो काढला आणि जॅकेट वरील प्रसाद साफ केला. साफ करून मी मलटोनी शोधू लागलो. थोडे पुढे रस्त्यापलीकडे होता मलटोनी. मी बायकोला म्हणालो की मी आलोच. ती बर म्हणाली आणि पुढे चालत राहिली. मी ते काम केले आणि रस्ता क्रॉस करून तिच्या मागे आलो.थोडीशी मान वाकडी करून तिने मागे बघितले आणि ती एकदम रस्ता क्रॉस करून पलीकडे गेली. मी क्षणभर बघतच राहिलो. मला काहीच कळले नाही. मी तिच्या मागे जाऊन हाक मारून म्हणालो,”तू असा एकदम रस्ता क्रॉस का केलास?“. तिला जोरात हसू आले. ती म्हणाली „अरे तो तु होतास का? मला वाटले की तू समोरून येशील. जॅकेटच्या कॅपमुळे जास्त मला दिसत नव्हते पण एवढे लक्षात आले की पाठीमागे कोणीतरी आहे. मला वाटले की कोरोना काळात अबस्टॅण्ड असलेले बरे म्हणून मी तडक रस्ता क्रॉस केला.“

आणि अशाच एका संध्याकाळी आम्ही वॉक करत होतो. एका वळणानंतर अंधार असल्यामुळे समोरचे काही दिसत नव्हते. वळल्यावर अचानक दहा फूट अंतरावर दोन तीन माणसे आली. आम्ही बोलत असल्याकारणाने आणि कदाचित ती बोलत नसल्यामुळे आम्हाला त्यांची चाहूल काही लागली नाही. मी आत आणि बायको रस्त्याच्या साइडला असे आम्ही चालत होतो. त्यांना बघून बायको एकदम रस्त्याकडे गेली, रस्ता क्रॉस करायला. रस्त्यावर पाय ठेवायला आणि समोरून कार यायला एकच गाठ पडली. मी प्रसंगावधान राखून तिला थोडे फुटपाथकडे ओढले आणि कार पुढे निघून गेली. मी बायकोकडे बघितले आणि म्हटले „अगं जरा जपून. अशी कुठे एकदम निघाली होतीस?“. ती शांतपणे म्हणाली "कारों से डर नहीं लगता साब, इन्सानों से लगता है". त्यानंतर आम्ही असे हसलो की काही विचारू नका. तिच्या या डायलॉग बाजीमुळे हसू आले खरे. पण असेही लक्षात आले की माणसांची भीती वाटायला लागली आहे

रस्त्यावरून बिल्डिंगमध्ये येऊ या. एके दिवशी आम्हाला ड्राइंग रुममध्ये गिटारचा आवाज ऐकू आला. तो माझ्या घरातील नक्कीच नव्हता. आम्हाला वाटले की कोण आहे जो इतके छान गिटार वाजवतो आहे. आम्हाला इतक्या दिवसांमध्ये कळाले नव्हते की कोणी असे आपल्या जवळ राहात आहे. कोरोनामुळे जी सगळीकडे शांतता झाली होती त्यामुळे ते संगीत कानावर पडले असावे कदाचित. गिटारची धून इतकी सुंदर वाजत होती की आम्हाला राहावले नाही. आम्ही ती रेकॉर्ड केली. आम्ही ठरवले की जे कोणी गिटार वाजवतो आहे त्याचा शोध घ्यायचा. आम्ही शोधले त्या माणसाला दोन तीन दिवसांत. तो माणूस जर्मन होता आणि आमच्या वरच्या मजल्यावर राहात होता. जाता येता आधी रोज आम्ही त्याला हाय हॅलो करत होतो. कधी ऑफिस संदर्भात आणि जनरल गप्पा पण मारल्या होत्या. पण हॉबीज बद्दल असे कधी बोलणे झाले नव्हते. त्या दिवशी मात्र भरपूर त्याच्यासोबत गप्पा रंगल्या. आम्ही जर्मन संगीत कसे असते भारतीय संगीत कसे असते याबरोबर जर्मन आणि भारतीय खाद्यपदार्थ खाद्यपद्धती बद्दल चर्चा केली. एकूण काय तर ओळख मैत्रीत बदलली.

माझी मुलगी एकदा टॉयलेट पेपरचा रोल घेऊन काही टिकटॉक व्हिडिओ करत होती. बायको एकदम तिला ओरडली की काय चालू आहे. टॉयलेट पेपर खराब होईल. मी म्हटले एवढे काय झाले तर बायको म्हणाली "एक रोल टॉयलेट पेपर की किमत तुम क्या जानो आनंद बाबू".

तर अशा गमती जमती होत आपल्याच माणसांची नवीन ओळख झाली. काही स्टँडर्ड गोष्टी पण केल्या. जसे की कुकिंग, एक्सरसाइज, म्युझिक एक्स्पेरिमेंट्स, वेबसिरीजच्या माळा बघणे वगैरे. सगळ्यात मोलाचे आहेत ते घरातील मंडळींबरोबर घालवलेले क्षण. कित्येकदा जे मिळावे वाटायचे ते हे क्षण होते. कोरोनामुळे त्रास तर झाला आहे अर्थ आणि वैद्यकीय व्यवस्थेला. जग बदलणार आहे हे नक्की. पण आपले प्रत्येकाचे जे जग आहे म्हणजे आपले घर,आपली माणसे, मित्र परिवार. ते आपल्याबरोबर कायम राहणार आहेत. त्यामुळे त्यांच्या बरोबर राहून मानसिक संतुलन न बिघडवता आपण आयुष्याची वाटचाल चालू ठेवूया.

अन्न वस्त्र निवारा एवढे असेल तर बाकी काहीच लागत नाही हे समजले या दिवसांमध्ये . सिनेमा, हॉटेल्स, मॉल्स इथे गेलेच पाहिजे अशी जी भावना होती ती बऱ्याच प्रमाणात बदलली. अशा गोष्टींच्या विना आपण वेळ घालवू शकतो ही भावना जागृत झाली. एकूण सगळ्या गोष्टींचा समतोल राखणे महत्त्वाचे आहे हे उमगले. जाता जाता काही मनातले

काळ हा असा आला|
विषाणूने एका घात केला|

खेळ असा हो मांडला|
माणूस जसा आहे तसा थांबला|

पण वसा हा घेतला|
विषाणू जरी निराळा|

संपवणार आम्ही त्याला|
जो थांबला तो संपला|

आनंद बापट,
स्टुटगार्ट, जर्मनी
(nndbapat@gmail.com)