आईच्या नजरेतून जर्मन लॉकडाऊन - पूजा गुणे (मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२०)

(सदर अनुभव हे मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२० साठी पूजा  गुणे यांनी फ्रँकफर्ट शहरातून लिहिले आहेत)

साधारण फ़ेब्रुवारी २०२० च्या दरम्यान कोरोनाच्या संकटाचे पडसाद संपूर्ण जगभरात उत्कर्षाने उमटू लागले होते. कोरोना विषाणू सर्रास एखाद्या वणव्यासारखा लोकांपर्यंत पसरत होता. अश्या पसरणाऱ्या विषाणूला आवार घालण्यासाठी प्रत्येक देशाने Lockdown करण्याचे पाउल उचलले.   Lockdown दरम्यान माझे काही आई म्हणून आलेले गमतीशीर आणि माझ्या कला गुणांना वाव मिळालेले अनुभव आज मी सांगू इच्छिते. माझा चिमुरडा 'चिंटू' , वय वर्ष २० महिने याच्या सोबत संपूर्ण lockdown मी खूप मजेत आणि बालपणीच्या माझ्याही काही आठवणींना उजाळा देत व्यतीत केले. उदाहरणार्थ, त्याचे नुकतेच सुरु झालेले बोबडे बोलणे, त्याच्या काही वेळा न समजणाऱ्या पण तितक्याच मनाला लोभस वाटणाऱ्या करामती, छोट्या छोट्या गोष्टींसाठी केलेले हट्ट हे सर्व काही मी आणि त्याने खूप छान अनुभवले.

खरं तर lockdown मुळे पाळणाघरांना सुद्धा सुट्टी असल्यामुळे जास्तीत जास्त वेळ आम्ही एकत्र व्यतीत करू शकलो. त्याचे बोबडे बोल जसे  की, Orange - ओवेन्ज , Giraffe - जिडॉ , मंकी - मोनी , बॉल - बॉं , आजी - आदू आणि बरेच असे खूप गमतीशीर शब्द ऐकायला मिळाले. वेगवेगळ्या प्रकारचे अन्न आवडीने स्वतः खाणे आणि एखादी गोष्ट हवी असल्यास "आई, मला शिला (शिरा) दे" असे त्याचे स्वतःहून सांगणे मनाला खूप सुखावणारे वाटले.

खरे तर हे अनुभवताना मला नव्याने पुन्हा एकदा आई झाल्याची जाणीव झाली. नाहीतर आपल्या धकाधकीच्या आणि एखाद्या रिक्षाच्या मीटरप्रमाणे सतत पळणाऱ्या आयुष्यात असे अनुभव तितक्या सहजतेने आणि बारकाईने अनुभवता येत नाहीत. खरं तर मी Lockdown ला धन्यवाद म्हणू इच्छिते. घराच्या बाहेर असणारा तणाव, निर्बंध आणि अनुषंगाने येणारी भीती हे सर्व काही मी सहजरित्या मुक्त करू शकले.  

या lockdown च्या काळात मला माझ्या मध्ये असलेल्या म्हणजेच चित्र रेखाटनाच्या गुणा बद्दल नव्याने ओळख झाली. प्रेरणा होती अर्थातच whatsapp ग्रुप मधील काही मैत्रिणींनी दिलेल्या साथीची. काही अवघड नसत गं, तू पण छान चित्र रेखाटू शकतेस. अश्या प्रेरणादायी वाक्यांनी आपणही "प्रयत्न" करून बघू असे ठरले. आणि खरंच मी ही प्रयत्नानंतर बऱ्यापैकी "ओके" चित्र रेखाटन करू लागले. शाळेत असताना 'चित्रकला' या विषयाचा वर्ग सुरु झाला की वाटायच, अरे देवा, आता ह्या पेन्सिल , रंग आणि उभ्या, आडव्या रेषा काढण्यापेक्षा , हा विषयच नसता तर किती बरं झालं असत! पण आता तेच रंग, त्याच पेन्सिल्स आणि चित्रकलेची वही देखील आपलेसे वाटतात. वेळ, 'चांगला वेळ' घालवण्याची आणि उत्तम कला आत्मसात झाल्याची सुखावह अनुभूती या lockdown मुळे आली.  

Lockdown मध्ये जसे गमतीशीर अनुभव अनुभवले तसेच मनाला चटका लावणारे ही काही अनुभव होते. कोरोनाच्या विळख्यात  प्रचंड माणसांचा बळी गेलाय आणि त्या विषाणूचे वणव्यासारखे पसरणे सुरूच आहे  अश्या प्रकारच्या बातम्या वाचून आणि ऐकून खूप वाईट वाटले. वुहान, इटली, स्पेन अश्या एक ना अनेक देशामध्ये पसरलेल्या कोरोनाचे जाळे तोडणे गरजेचे होते. त्यासाठी प्रत्येक देशाने उचललेलीं पाऊले आणि लोकारक्षणासाठी घेतलेले निर्णय यांचे कौतुक करावेसे वाटते.   जर्मनीने सुद्धा मोठ्या प्रमाणात कोरोनाला नष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले. Social distancing, मास्क वापरणे,अल्प संख्यात लोकांनी एकत्र येणे असे बरेचसे नियम लागू केले गेले आणि लोकांनी  सुद्धा या नियमांना भरपूर प्रतिसाद दिला.

इथे एक माझा छोटासा अनुभव सांगेन. कोरोना मुळे मनात खूप भीती बसली होती त्यामुळे रेवे(Rewe) मध्ये सामान आणण्यासाठी गेले असता, समोरून येणाऱ्या 'प्रत्येक माणसाला' जणू कोरोना झालाय की काय या भीती ने बघितला जायचं. पण अर्थात ते भीती पोटी येणारे विचार होते.   अखेर माणसाने  माणसाला वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न फळास येत आहेत. जगभरातून कोरोना संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी दिवस रात्र काम करणाऱ्या डॉक्टर्स, परिचारिका आणि संशोधकांना सलाम! अश्या प्रकारे, माझे जर्मनीतील lockdown चे संमिश्र अनुभव सांगताना लेखणी इथेच थांबवावीशी वाटत नाही. खरं तर खूप काही सांगण्यासारखे आहे परंतु माझ्या चिमुरड्या बरोबर पुन्हा एकदा खेळाचा डाव मांडायची वेळ झाली आहे!

पूजा गुणे,
फ्रँकफर्ट , जर्मनी
(pooja.r.kasar@gmail.com)