जर्मनीतले लॉकडाऊनचे अनुभव - मधुरा देशपांडे - शेंबेकर (मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२०)

हाय, माझं नाव सृजन...वय वर्षे साडे तीन..चारचा होईलच आता..राहतो जर्मनीत, श्वेट्झिंगेनला.

तर माझं रोजचं एक रुटीन होतं, सकाळी उठून शाळेत म्हणजेच किंडरगार्टनला जायचं, दुपारी घरी यायचं, खेळायचं, टीव्ही बघायचा, झोपायचं. हे झालं खूप जनरल, यात वयानुसारचे हट्ट, कधी अजिबात त्रास न देणं, हेही सगळं रोजच. मग आमच्या किंडरगार्टन मध्ये म्हणे केअर टेकर कमी आहेत सध्या, तर त्यांनी एक तास कमी केला रोजचा, हे कोरोना नसतानाचं बरं का. म्हणजे शाळा लवकर सुटणार असं कळलं, मला काय, काहीच फरक पडत नाही, आई बाबांना टेन्शन, त्यांच्या चर्चा चालूच होत्या कसं करायचं वगैरे. पण मग एक दिवस अचानक शाळा बंदच झाली म्हणे, आता उद्यापासून शाळेला मोठ्ठी सुट्टी असं सांगितलं मला. कोरोना आला ना म्हणून. पाच आठवडे म्हणजे किती हे नाही समजत मला, पण सुट्टी आहे हे मला तसं आवडलंच, पूर्ण समजलंही नव्हतं पण त्याने फरकही पडत नव्हता.

आई बाबांचं ऑफिस कुठे आहे ते मला माहीत आहे आणि त्या रस्त्याने जाता येता मी नेहमी "हे बघ तुझं आफिश काम" असं सांगत असतो, पण आता आई बाबा घरून काम करणार म्हणत होते. मग आमच्या एका खोलीत एक टेबल, नवीन खुर्ची, त्यावर दोन दोन लॅपटॉप, असं सगळं हळूहळू येत गेलं. पहिले काही दिवस मी मज्जा केली, म्हणजे आई बाबा दिवसभर सोबत हे कुणाला आवडणार नाही? मस्त उशीरा उठायचं असं मला सांगण्यात आलं, पण मी रोज लवकर उठून बसायला लागलो. शाळा बंद झाली ना म्हणून. शिवाय त्यांनाही सवय नव्हती या सगळ्याची, तेही गडबडले होते. खरं तर त्यांच्या ऑफिसात आधी असं घरून काम करूच देत नव्हते, पण अचानक या कोरोनाने सगळं बदललं आणि ते एक त्यांना बरं वाटत होतं, की या निमित्ताने तयार झाले. मग एक जण ऑफिस काम करेल, एक माझ्यासोबत खेळेल असं चालू झालं, पण घरातली कामं पण असतात त्यांना. तरी आम्ही कधी काही रंगव, कधी पुस्तक वाच असं करायचो. कधीतरी आईला एकदम उत्साह यायचा कहीतरी क्रिएटीव्ह करण्याचा, पण त्यात मी बरेच वेळा मी रंग सांडवणे, पाणी सांडवणे हेही करतो, त्यामुळे गडबड होतच असते सतत. एकूणात दर पाचव्या मिनीटाला मला काहीतरी हवं असायचं, कधी पाणी, कधी भूक लागायची, त्यात पण हे नको, ते पाहिजे हे असतं, कधी मी पडायचो, कधी काही लागलं नाही तरी मला पट्टी लावून हवी असायची, कधी टीव्ही का बंद झाला अचानक म्हणून डोकं फिरायचं....

ते दोघंही काम करत बसले की मला टीव्हीच हवा असायचा, त्यात पण मी "ममा, हे गाणं लाव, बाबा, मला हे गाणं पाहिजे" असं सांगत असतो. मग आई म्हणते दर दोन मिनीटाला उठावं लागतं, त्याच्यापेक्षा घे बाबा मोबाइल आणि बघ थोडा वेळ तुला पाहिजे ते. मग स्क्रीन टाइम जास्त झाला की ते बंद होतं, मग मी दिवसातून अर्धा तास एकाच जागी लपून लपाछपी खेळू शकतो, आई बाबांचा पेशन्स संपतो दहा वेळा लपल्यानंतर. मग मी ट्रेनचे रुळ लावायला जायचो, तर पुन्हा "ममा, हे मला जमत नाही, तू प्लीज मला मदत कर." मग आई वैतागून म्हणायची की "अरे, सकाळी उठून काम करू देत नाही, झोपून राहात जा ना म्हणजे सकाळी कामं करून आता खेळू." तरी जवळ घेऊन पाप्या पण घेते, लाड पण खूप करते. मग तेवढी मदत करून ती कामाला बसली की तिचं लक्ष लागत नाही कामात, मग ती पण टाइमपासच करते आता हे दोघं सारखे मोबाईल घेऊन बसतात बरं का, पण मला मात्र सतत टीव्ही नाही बघायचा असं सांगतात. मग रात्री ऑफिसचं काम करत बसायचे ते, दिवसभर काही झालं नाही तर. मग मी छान खेळलो की बक्षीस पण मिळायचं काहीतरी. नवीन खेळ पण बरेच आणले एवढ्यात माझ्यासाठी.

सगळ्या घसरगुंडीच्या इथे मोठ्या चिकटपट्ट्या लावल्या होत्या, तिथे पण जायचं नाही. पुन्हा काय तर कोरोना. मग मी एक दिवस कंटाळून खूप रडलो, आईनी विचारलं की शाळेची आठवण येते का, मग तर खूपच रडू आलं, कारण तेच होतं ना. आणि असं अधून मधून असं होत राहिलं, मग आई बाबा जवळ घेऊन शांत करायचे आणि मी परत खेळायला सुरूवात करायचो. हळूहळू मी टीव्ही वरून जास्त मोर्चा वळवला मोबाईल वर, कारण मग आई बाबांसोबत त्यांच्या शेजारीच बसता यायचं, मीच लक्ष ठेवायचो म्हणा त्यांच्यावर.

मधूनच ते दोघं पण फोनवर, नेमका तेव्हाच मी आवाज केला काही की शांत रहा, काय हवंय, घे हे खायला म्हणून परत जायचे बोलायला. माझा स्क्रीन टाइम वाढला की मी खुष. खरं तर टीव्ही म्हणजे युट्युबच्या त्याच त्याच गाण्यांचा मला पण कंटाळा यायचा, पण नवीन खेळणी तरी किती वेळ खेळणार, मग मी परत टीव्हीला चिकटायचो. किंवा कंटाळा आला की बाकी काही नकोच वाटायचं.

मग खूप जणांना आई बाबा फोन करायचे, त्यांची मुलं माझ्याएवढीच, इकडून आई बाबा त्यांच्याबद्दल बोलणार, विचारणार, तिकडून ते सृजन, किती उंच झाला, शाळेत जातो का? काय खाल्लं तू आज ? असे प्रश्न विचारणार. रोज नवीन नावं कळायची, कधी आईची मैत्रीण तर कधी बाबाचा मित्र. मला इथले मित्र मैत्रिणी फक्त माहीती आहेत, मूड असेल तर मी बोलायचो, कधी दूर पळायचो. मग मी त्यांच्या फोनचा कंटाळा आला की मीराला फोन करायला सांगायचो, कारण मी तिलाच ओळखतो आणि अजून एक दोन जणांना फक्त. मग आम्ही दोघं आपापल्या घरी उड्या मारायचो आणि त्यात आम्हाला खूप मजा यायची. पण मग तिच्या घरी जायचं म्हणून मी मागे लागायचो आणि ते पण जाता येत नाही असं आई बाबा सांगायचे.

नेहमी मी दुकानात जातो आई बाबांसोबत, पण आता ते बंद झालं, मग माझे प्रश्न होतेच तयार, की कोरोना का आला? तो काय करतो? शाळा का बंद? दुकानात मी का नाही जायचं? असे अनेक. मग आई सांगायची त्यातल्या त्यात सोपं करून, थोडं कळायच; थोडं नाही.

तसे आम्ही रोज बाहेर जायचो पण, माझी सायकल घेऊन, दोन गल्ल्या गेल्या की लगेच खूप शेतं आहेत, तिथून मधून रस्ते आहेत पायी चालण्यासाठी. तिथे जायचं, माझी बॅग असायचीच सोबत, त्यात कधी मखाणे, कधी बिस्कीट, कधी दाणे, पिस्ते, फळं असा काहीतरी खाऊ घेऊन तिथे शेतात बसायचं, पिकनिक करायची, ऊन खूप असेल तर आईसक्रीम खायचं येताना आणि मग झाली पिकनिक. किंवा येताना बेकरीमधून काहीतरी ब्रेत्झेल घ्यायचं. घरी आलो की पहिले हात धुवायला पळायचं. मला खूप कंटाळा यायचा कधीकधी, हे आधी एवढं शिस्तीचं नव्हतं पण आता ते सतत सांगतात आई बाबा. किंवा मग दुपारी आमच्या गॅलरीत पिकनिक करू म्हणून मी मागे लागायचो. दुपारी मस्त आंबे खात मग गॅलरीत बसून आम्ही पिकनिक करायचो.

एकदा आम्ही हॉकेनहाइमला गेलो होतो इथे जवळच, तर तिथे लहानशा नदीजवळ कुणीतरी रंगीत दगड आणून ठेवले होते रंगवलेले, इंद्रधनुष्य, फुलं, अजून काय काय चित्र काढलेली. आई म्हणाली की आपण पण आणू इथे दगड, पण ते राहिलंच, पण बाकीच्यांचे हे फोटो होते हे बघा.

माझ्या शाळेसमोरूनच जायचो आम्ही पायी, तर तिथे पण सगळ्यांनी इंद्रधनुष्याची खूप चित्र रंगवली होती, खूप जणांच्या खिडक्यांवर पण इंद्रधनुष्य होते रंगवलेले. मला शाळेनी पत्र पण पाठवलं होतं, माझ्यासाठी पत्र आलं तर मी खूष झालो, माझं नाव आहे म्हणे तिथे. त्यातली चित्रं पण मी रंगवली.

मग हळूहळू मी सरावलो या रुटीनला, आई बाबा पण. आम्ही तशी मजा केली खूप या सगळ्यात, माझी सायकलची प्रॅक्टीस झाली, आई बाबांनी लाड पण केले खूप, सगळा वेळ आम्ही सोबत, सकाळची घाई नाही काही, उठलो की खेळ चालू, कधीही आंघोळ, कधीही खाणं. सुट्टी वाढतच होती, मधूनच खूप कंटाळा यायचा, मग कोरोनाला पळवून लावू असं मी पुहा पुन्हा सांगायचो. माझा टेडी, मिकी, भूभू सगळ्यांना मी सांगायचो की हात धुवा सतत.

मला माझ्या बुलधानान्याच्या आजीची एक गंमत, म्हणजे तिने केलेला खाऊ खूप आवडतो. पण विमान नाही तर कसे येतील ते, कुरियर पण नाही येणार...मग मी सतत "जेवा कोलोना जाईल, तेवा आपन भालतात जाउ, मग मला आजी गंमत देइल" असं सांगत असतो. मला आईसलँडला पण जायचं आहे विमान चालू झाल्यावर आणि लंडनला पण, ते गाबी अ‍ॅलेक्स असतात तिथे टीव्हीतले माझे आवडते म्हणून.

मग आई बाबा मास्क घालून जायला लागले दुकानात. तरी मला आत नेत नव्हते. आता परवा कधीतरी ममा मला म्हणे, आपण दुकानात जाऊ. मी तीन तीन वेळा विचारलं की मला येता येईल? कोरोना गेला? खरंच वाटत नव्हतं मला, तर ती म्हणाली की कोरोना थोडा थोडा गेला. मला मास्क पण घालायचा नव्हता, मग मी दुकानात गेलो, बेकरीत जाऊन माझा आवडता केक खाल्ला, हे सगळं मी कित्ती कित्ती दिवसांनी करत होतो, माझे केस खूप वाढले होते, खूप दिवस ते दुकानच बंद होतं, मग शेवटी उघडलं ते दुकान आणि केस कापले मी आणि बाबानी पण. तिथे सगळे मास्क लावून होते, हे मला सगळीकडेच अजून नवीनच वाटतं आणि मग मास्क का लावला, त्याने काय होतं असे प्रश्न पण पडतात. आता मित्र मैत्रिणींसोबत Speilplatz ला पण जाता येतं.

आता पुन्हा शाळा चालू झाली. मधूनच चालू, मधूनच बंद, पण तो कोकोमेलनचा जेजे म्हणतो ना I am so excited but nervous too, but it will be ok on my first day of school तसं मला आई बाबा सांगत होते. खूप मोठा ब्रेक झाला म्हणून त्यांना काळजी वाटत होती, पण मला खूप छान वाटलं. माझे सगळे मित्र मैत्रिणी नव्हते आले, थोडेसेच मुलं होते. आता पुन्हा काही दिवसांनी शाळेचा कंटाळा येईल, सध्या छान वाटतंय. सतत आई बाबांचे चेहरे तरी किती बघायचे ना? त्या कोरोनाचा राग आलेला आहेच मला, पोलीसांना सांगितलं आहेच मी. घरात मधमाशी आली की तिला मी जसा Geh weg म्हणतो, तसाच कोरोनाला पण सांगतो. मला दूध पिऊन खूप शक्ती मिळाली की मी प्रत्येक वेळी सांगतो, „आता मी कोरोनाला पळवून लावू शकतो, उडून जाईल मग तो“

तर अशी होती ही माझी कोरोना सुट्टीतली थोडी सजा, थोडी मजा. तुम्ही काय काय केलं?


मधुरा देशपांडे - शेंबेकर
(madhurad1986@gmail.com)