कुणी घर देता का घर! - जुईली आणि अभिजीत (मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२०)

(सदर अनुभव हे मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२० साठी जुईली आणि अभिजीत यांनी Bielefeld शहरातून लिहिले आहेत )

या सगळ्याची सुरुवात झाली आहे मित्रांनो, २१ डिसेंबर या तारखेला. हो. याच दिवशी माझे आणि माझी मैत्रीण जुईचे लग्न झाले भारतात. आणि तिकडे चीन मध्ये कोरोना व्हायरस सुद्धा याच दिवसात सापडला असे म्हणतात. आम्ही लग्नाच्या आधी वेगवेगळ्या ठिकाणी राहत  होतो कामानिमित्त आणि दोन्ही ठिकाणचे अंतर होते अंदाजे ३५० किलोमीटर. त्यामुळे मित्रांमध्ये आम्ही “वीकएंड कपल” म्हणून प्रसिद्ध होतो. लवकरच हे सर्व संपवायचं होतं आणि एकत्र राहायची सुरुवात करायची असे प्लॅन्स आम्ही आखत होतो. त्यामुळे आमचं सततचं "ICE" दर्शन बंद होणार होतं. पण कोरोना नावाचा विषाणू तिकडे चीन मध्ये धुमाकूळ घालतोय हे आम्ही वाचत होतो.  हे सर्व कुठेतरी आपल्याकडे येणार नाही हे मन सांगत होतं आणि आमचे पुढचे प्लॅन्स हळूहळू ठरत होते.

पण एका दिवशी जर्मन सरकारने प्रतिबंधात्मक उपाय सुरु केले आणि आमचे एकत्र शिफ्ट होण्याचे स्वप्न थोडे लांबणीवर पडेल असं वाटून गेलं. आणि थोडासा परिस्थितीचा अंदाज घेऊन आम्ही काही दिवस माझ्या येथे "Bielefeld" मध्ये एकत्र राहायला सुरुवात केली आणि इथूनच मोठ्या घराचा शोध सुरु झाला. गेल्या काही वर्षातला घर शोधण्याचा अनुभव असल्यामुळे घर शोधणे तेही कामाच्या ठिकाणी (Lemgo सारख्या छोट्या गावात) अवघड वाटलं नाही. आणि मग वेबसाइट्स वरचा शोध सुरु झाला. या काळात सर्व Hygiene पाळून कोणी घर पाहू द्यायला तयार होईल कि नाही अशी शंका होती. पण ४ मे रोजी संपर्काचे नियम शिथिल झाल्यानंतर मग शोधाला जोर आला. आणि पहिली अपॉइंटमेंट मिळाली घर पाहण्याची. मग सर्व प्रकारे काळजी घेऊन मास्क लावून सॅनिटायझरचे डबे सोबत घेऊन आमचा प्रवास सुरु झाला घर पाहण्यासाठी. ४५ मिनिटे प्रवासाचे, ते सुद्धा मास्क घालून हा सर्व पहिलाच अनुभव होता. घर पाहून झाले आणि मग आठवड्याभरातच घर फायनल करून वेळ आली कॉन्ट्रॅक्ट साइन करायची आणि घर मालकिणीच्या पहिल्या भेटीची. पुन्हा एकदा निरीच्छेने का होईना पण मास्क घालूनच आम्ही सर्व सोपस्कार पार पाडले. हुश्श... घराचा शोध संपला!

मग वळलो स्प्रिंग मधल्या आवडीच्या कामाकडे. बागकाम! हा असा सीझन आहे, ज्यामध्ये सर्व आवडती झाडे लावता येतात. आम्ही ठरवून इकडे विशेष न मिळणाऱ्या भाज्या म्हणजे कोथिंबीर, मेथी, वगैरे यांची छोटेखानी शेती सुरु केली. आता हीच सर्व झाडं आमच्या नवीन मिळालेल्या घरामध्ये घेऊन जायची असल्यामुळे त्यांची विशेष काळजी घेणं सुरु झालं. काही इनडोअर झाडं आणली. ज्यांनी नव्या घराची शोभा वाढेल अशी काही झाडे “IKEA” आणि “Baumarkt” मधून घेऊन आलो. कोरोना नंतरची पहिलीच सुरुवात असल्यामुळे या सर्व दुकानात प्रचंड गर्दी होती. सर्व लोक अंतर ठेवून आणि मास्क घालून रांगेत उभी आणि त्यात आम्ही सुद्धा होतो. नियंत्रित गर्दी, स्वच्छता आणि लोकांनी एकमेकात ठेवलेले अंतर यामुळे नेहमीप्रमाणे खरेदी मधला आनंद लुटता आला (मास्क सांभाळून खरेदी करणे हे तंत्र मी अजूनही शिकतोय). या वर्षी नवीन प्रयोग म्हणून लसणाची पात आणि मूग देखील लावून पाहिले आणि हा प्रयोग यशस्वी होतोय, हे झाडे वाढताना पाहून आशा तरी वाटतेय.

दिवसामागून दिवस जात होते आणि मास्क घालून एके एक फर्निचर खरेदी सुद्धा सुरु होती. केलेली सगळी खरेदी जुन्या घरात येऊन पडत होती. आता तर झाडांनी आणि वस्तूंनी घर अक्षरशः भरून गेलय. घराच्या एका भागात तर जंगलाचा फील येतो. आता आस लागली आहे नव्या घरात शिफ्ट होण्याची. अजून एक महिना आहे शिफ्टिंगला, पण सर्व खरेदी होऊन नवीन वस्तू जुन्या घरात विराजमान आहेत आणि आमची पालखी यांच्यासहित नव्या घरात जाण्याची वाट पाहतेय. या काही दिवसात मात्र वर्क फ्रॉम होम असल्यामुळे ट्रेन प्रवास बंद झालाय आणि पुस्तक वाचन मात्र थांबल्यासारखे वाटतेय. लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच गोष्टी केल्या असल्या तरी पुस्तक वाचनात खंड पडल्याची खंत आहे. ह्या विषाणूने गेल्या काही दिवसात आम्हाला अटीतटीच्या प्रसंगात देखील कशाप्रकारे गृहशोध होऊ शकतो हे शिकवले आणि “कुणी घर देता का घर” असे म्हणण्याची आमच्यावर वेळ आली नाही हे सुदैव.

आपण सर्वांनी देखील काळजी घ्या आणि निरोगी राहा. ते म्हणतात ना "सिर सलामत, तो पगडी पचास"!!!!

जुईली आणि अभिजित
Bielefeld,जर्मनी
(abhijeet.shrotri6@gmail.com)