भीती वाटतीये हो मला ! - अनिकेत साठे (मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२०)
नमस्कार मंडळी,
फेब्रुवारी २०२० मध्ये काही कामानिमित्त मी पहिल्यांदा जर्मनीत आलो. तेव्हा तशी थंडी होती. पण आता फ्रांकफुर्ट मध्ये उन्हाळा वाढलाय नई. आणि एवढ्या उन्हाळ्यात सुद्धा इथली लोकं तोंडावर मास्क घालून फिरतायत. 'Social Distancing' का काय, ते follow करतायत म्हणे. बाकी तुम्ही कसे आहेत? बोलायच्या नादात माझं नाव सांगायचंच राहून गेलं. माझं नाव 'Covid19 - DE234902'. उच्चारायला थोडंसं अवघड आहे. पण जन्म झाल्या झाल्या माझी पोस्टिंग जर्मनी मध्ये झाली. म्हणून नाव पण तसंच मिळालं.
गेले २ तास झाले, मी आमच्या चीनच्या सर्विस सेंटर ला कॉल करायचा प्रयत्न करतोय. अहो,अवघड परिस्थिती होऊन बसलीये इकडे जर्मनी मध्ये आमची. गेल्या काही दिवसात माझे खूप जवळचे गमावले आहेत मी. मनुष्य जातीला संसर्ग द्यायला हजारोच्या संख्यांनी आलेलो आम्ही, आता फक्त काही शेकडोच उरलेलो आहोत.
सुरवातीला मार्च महिन्यात इथली जनता थोडी गाफील होती, त्यामुळे आम्हाला प्रसाराला थोडी मदत मिळाली. पण थोड्या दिवसातच इथल्या सरकारने 'lockdown' घोषित केल्यामुळे आमचा प्रभाव थोडा कमी झाला. शाळा ,कॉलेजेस ,हॉटेल्स आणि थिएटर्स बंद झाले. मोठमोठे मॉल्स बंद झाले. अहो जर्मनीमध्ये प्रत्येक दिवस रविवार आहे असेच वाटत होते. रस्त्यावर कोणीच नाही. बहुतेक लोकांनी आवश्यक वस्तूंचा साठा घरी करून ठेवलेला असावा. त्यादिवशी मी ठरवले. असा माणसांचा घोळका आता काही मिळणे शक्य नाही. एकेक माणसाला टार्गेट करूयात.
मी एका मुलाचा खूप दिवस पाठलाग करत होतो. तो मुलगा दिसायला भारतीय वाटत होता. म्हणलं लवकरच ह्याच्या शरीरात घूसूयात. दररोज त्याचा दारापाशी बसायचो. आत्ता बाहेर येईल, मग बाहेर येईल. पण कधी त्याच्या संपर्कात यायची संधीच मिळाली नाही. एके दिवशी संध्याकाळी बरोब्बर ५ वाजता तो दारात आला. म्हणलं हि चांगली वेळ आहे. जाऊन त्याचा हाताला चिकटावे. त्याच्या जवळ जायला निघालो, तेवढ्यात, त्यानी जोरजोरात ताट आणि चमचा वाजवायला सुरवात केली. द्णा द्ण. मला काही वेळासाठी सुधरलंच नाही, हे काय चालूए ते. आकाशाकडे बघून त्याचे जोरजोरात वाजवणे चालूच होते. थोड्यावेळानी तो आवाज असह्य झाल्याने मी तिथून पळ काढला. तो मुलगा ५ वाजून १५ मिनीटांनी ताट वाजवायचा थांबला, आणि आपल्या घरी निघून गेला. त्या दिवसापासून ठरवले ह्याच्या घराकडे ढुंकून सुद्धा बघायचे नाही.
ह्या गोष्टीला आता दोन महिने होत आले. तरीपण मला कुठल्याही माणसाच्या आत घुसता आले नाहीए. इथल्या सरकारने lockdown सुद्धा हटवले आहे. आता तर इथल्या रुग्णांची संख्या खूपच कमी झाली आहे. सगळी माणसे बाहेर पडायला लागलीएत. आता तुम्ही म्हणाल, ही तर माझ्यासाठी खूप चांगली गोष्टं आहे. मला खूप सहजरित्या ह्या माणसांवर हल्ला करता येऊ शकतो. नाही. पण तसे नाहीए. जर्मनी मध्ये शिस्तीला फार महत्व आहे. U Bahn, S Bahn मध्ये लोकं मास्क लावल्याशिवाय चढतच नाहीएत.
त्यांच्या आत घुसायचं तरी कसं. सगळ्या सार्वजनिक जागांमध्ये ठराविक अंतर ठेऊन लोकं चालतात. मग आम्हाला माणसांचा घोळका कसा मिळणार.
परवाच माझा एक मित्र Rewe च्या ट्रॉलीवर बसला होता. पुढचा जो कोणी गिर्हाईक येईल त्याच्या हाताला चिकटायचं आणि मग त्याचा शरीरात घुसायचं, असा त्याचा प्लॅन होता. प्लॅन नुसार सगळं काही सुरळीत चालू होतं. एक गिर्हाईक आला. त्याने ट्रॉली बाहेर काढली. माझा मित्र त्याचा हातावर बसला. आणि तो गिर्हाईक ट्रॉली घेऊन खरेदीला गेला. संपूर्ण खरेदी झाल्यावर त्याने ट्रॉली परत जागेवर line मध्ये ठेऊन दिली. माझा मित्र त्याचा हाताला चिकटून तसाच होता. पण तेवढ्यात त्या गिर्हाईकाने Rewe च्या दारात जाऊन, तिथे ठेवलेले हॅन्ड सॅनिटायझर हाताला लावले. माझा मित्र जागीच गेला बिचारा. अहो, इथली माणसं खूप खबरदार झाली आहेत आमच्याबद्दल. हे जर का असेच चालू राहिले तर काही आठवड्यातच आमचं इथलं अस्तित्व संपून जाईल.
शिस्त आणि नियमनाचे पालन, ह्या दोन गोष्टींनी जर्मन लोकांनी आमच्यावर मात केली आहे. नाही म्हणजे नाहीच. मास्क लावल्याशिवाय सार्वजनिक जागेत जर्मन लोकं फिरतच नाहीत. उगाच कुठेही गर्दी करत नाहीत. छोट्या छोट्या kiosk पाशी पण २-२ मीटर अंतर ठेऊन रांग करतात. परवाच एका ८५ वर्षांच्या आजोबांना एका सुपरमार्केटच्या बाहेर लाईनमध्ये थांबलेलं बघितलं. तब्बल २० मिनिटे लाईनमध्ये थांबल्यावर ते आत गेले. त्यांची चिकाटी बघून, आम्ही आता हरलो आहोत हे मला कळून चुकले होते.
मला नाही वाटत मी अजून फार काळ ह्या देशात टीकेन. म्हणून मी कितीवेळ झाला आमच्या सर्विस सेंटर ला कॉल करतोय. भीती वाटतीये हो मला !
अनिकेत साठे
Frankfurt, Germany
(https://www.facebook.com/aniket.sathe.58)