जर्मनीतले लॉकडाऊनचे अनुभव - अंजली लिमये - (मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२०)

जर्मनीतील लॉकडाऊन खरंतर माझ्या पथ्यावरच पडलं असं म्हणायला हरकत नाही.थोडीशी कुणकुण लागल्यावरच मनाची तयारी सुरू केली होती. लॉकडाऊन ची सुरुवात इथे खरच शिस्तीत झाली. मास्क लावून बाहेर पडणे, दोन माणसांच्यात दीड मीटर चे अंतर ठेवणे , हस्तांदोलन बंद! वगैरे सगळे नियम पाळताना लोक दिसत होते.

ज्यांना शाळेत जाणारी मुले आहेत त्यांना तातडीने घरीच थांबणे अटळ असल्याने ऑफिस मधले निम्यापेक्षा जास्त लोक घरून काम करू लागले. माझे ट्रेन ने ऑफिस ला येणे जाणे नेहेमीप्रमाणे चालूच होते पण त्यात एक मोठ्ठा फरक जाणवत होता. एकतर शाळेची मुलं नसल्यामुळे पाय ही ठेवायला जागा नाही इतकी गर्दी असलेल्या ट्राम, बसेस आणि ट्रेन अगदी रिकाम्या धावत होत्या. रोज दिसणाऱ्या ओळखीच्या चेहऱ्याची माणसे हळूहळू दिसेनाशी झाली. एकदा तर संपूर्ण ट्रेन फक्त माझ्यासाठीच पाठवल्यासारखी मी एकटीच ट्रेन मधे होते. शहरातील बाजारपेठेतील मुख्य रस्ते अक्षरशः ओस पडले.

मास्क, हॅन्डग्लोवज,डिसइनफेक्शन मटेरियल यांचा तुटवडा जाणवू लागला. माझी कंपनी औषधे वितरीत करणारी असल्यामुळे कामाचा अतिरिक्त भार पडला होता. आणि सर्वच्या सर्व ऑर्डर्स केवळ याच गोष्टींच्या येत होत्या.त्यामुळे एकीकडे लॉकडाऊन असले तरी वेअरहाऊस मधे तीन शिफ्टस मधे काम सुरू करावे लागले!

पेशंट्स चा वाढत जाणार आकडा बघता परिस्थिती गंभीर वळण घेणार असे वाटू लागले.ऑफिस ला जावे लागत असल्यामुळे सगळीकडून काळजीचा सूर असणारे प्रश्न विचारले जाऊ लागले.

पण या सगळ्यांची काळजी जर्मन रेलवे ने ऐकली आणि अप्रत्यक्षपणे मला मदत केली ! जर्मन रेलवे ने अधिकृतपणे जाहीर केले की रेलवे चे वेळापत्रक बदलण्यात येणार असून, सर्व रेलवे , ट्राम आणि बसेस हॉलिडे प्लॅन नुसार धावतील. अर्थात त्यामुळे त्यांची फ्रीक्वेन्सी फारच कमी होणार होती. आणि माझा ट्रॅव्हलिंग चा वेळ दुपटीने वाढणार होता. शिवाय प्रवासी कमी असले तरी लागण होण्याची रिस्क फारच वाढली होती. अर्थातच मग मला घरून काम करण्याची मुभा आपसूक मिळाली !

आता खऱ्या अर्थाने लॉकडाऊन सुरू झाले.आता मला पहाटे उठून, गडबडीत आवरून बाहेर पडायची गरज नव्हती वा उद्याच्या डब्याची भ्रांत नव्हती! निवांत उठून , न आवरता, घरात हवं तिथे, हवं तसं बसून काम करता येणार होतं. घरून काम करण्याचा आनंद जितका होत होता तितकाच अनेक अनुत्तरित प्रश्नांचा जन्म होत होता. हे असे किती दिवस चालणार? घरातले सामान संपले तर बाहेर जाण्याची रिस्क घ्यायची की आहे ते खाऊन समाधान मानायचं? खूप काळजी घेऊनही आपल्याला लागण झालीच तर काय करायचं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळवायचा प्रयत्न चालू होता.

करोना बाधितांच्या संख्येचा चढता आलेख, उलट सुलट येणाऱ्या बातम्या, करोना विषाणूचा तो चित्र-विचित्र आकार याचा सतत मारा झाल्याने उगाच आपल्या घशात खवखवतय की काय असं वाटत राही. मन शांत ठेवायचा जितका म्हणून प्रयत्न करावा, तितकाच तो बातम्या वाचून असफल ठरत होता. मनाची चलबिचल वाढत होती.घरातून बाहेरच पडलो नाही तर काही होणार नाही हे माहीत असूनही म्हणतात ना , "मन चिंती ते वैरी न चिंती" अगदी तसे होत होते.

दरम्यान भारतातही लॉककडाऊन जाहीर झाला. जगभरातून भारताच्या योग्य वेळी घेण्यात येणाऱ्या निर्णयाचे कौतुक झाले, आणि व्हाट्स ऍप युनिव्हर्सिटी ला तोंड फुटले!! अमुक काढा, लसूण -कांदा यांचे प्रमाण वाढवा, मांसाहारी पदार्थ टाळा,उन्हात करोना मरतो.. वगैरे भोंदू forwards ने मोबाइल भरला.इथपर्यंत ठीक होतं, पण नंतर नथीचा नखरा, नवरा माझा नवसाचा.. अशी चॅलेंजेस सुरु झाली ! सगळे जण जमेल त्या पद्धतीने लॉकडाऊन सुसह्य कसा होईल याचा आपापल्या परीने प्रयत्न करीत होता.

घरून काम असल्यामुळे time table चा बोजवारा उडाला होता. उशिरा उठणे , एकामागून एक  कॉन्फरन्स कॉल , कसे बसे दुपारचे जेवण उभ्या उभ्या उरकावे लागत होते.शेवटी न राहवून एम्प्लॉयी चा स्टेटस busy/break यापैकी काही असेल तर कॉल करू नये असा नियम केला!

पण या सगळ्यात एक लक्षात आले ते म्हणजे शिस्तीला पर्याय नाही. मनात आले या मिळालेल्या बंदिस्त स्वातंत्र्याचा उपयोग आणि आनंद असा दुहेरी योग्य फायदा करून घेता आलाच पाहिजे!

होम ऑफिस चालू झाल्यामुळे माझ्या हातात अचानक संपूर्ण 2 ते अडीच तास बोनस उरत होते त्यातून मग मी रोज एक गीतेचा अध्याय वाचणे आणि किमान 12 सूर्यनमस्कार आणि निदान 15 योगासने यांचा सराव चालू केला. अजून तरी यात खंड पडलेला नाही.

मग आणखी एक कल्पना सुचली. कविता लिहिणाऱ्यांचा आमचा एक व्हाट्स ऍप ग्रुप आहे. त्यावर आम्ही वेगवेगळ्या विषयांवर कविता लिहिण्याचे उपक्रम घेतो. तर अश्या उपक्रमातल्या स्वरचित कविता वाचण्याची ऑनलाइन मैफल भरवायची. कल्पना सगळ्यांना अर्थातच पसंत पडली. या ना त्या कारणासाठी नवनवीन मीटिंग अँड कॉन्फरन्स  ऍप डाऊनलोड केलेलेच होते. त्यावरच या मैफिलीं भरवल्या. अगदी प्रत्यक्ष समोर बसून मैफिलीत कविता ऐकतोय असे वाटायचे आणि तात्पुरतं का होईना त्या करोना च्या गराड्यातून सुटल्यासारखे वाटायचे.

सोशल मीडियातून विविध विषयांवरच्या मुलाखती ऐकणे, अनुभव ऐकणे , महितीवजा प्रेझेन्टेशन पाहणे यात वेळ जात होता. शिवाय सासर-माहेरकडचे नातेवाईक, शाळेपासून चे मित्र मैत्रिणी, कधी कवितेमुळे ऑनलाईन ओळख झालेल्या नेट फ्रेंड्स सोबत असे एक ना अनेक विडिओ कॉल्स चालूच होते. दरम्यान प्रत्येक घराघरातून एक डॉक्टर, एक ऍनॅलिस्ट, एक फायनान्स मास्टर यांचे जन्म होत होते. अनेक तर्कांना उधाण आलं होतं. तर काही जण घाबरून आता जगबुडी जवळ आली, यातून काही सुटका नाही, माणूस माणसाला दुरावला वगैरे इमोशनल बाण मारून उगाच चिंतेत भर घालत होते.

बऱ्याच ओळखीच्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचे यूरोप भेटीचे स्वप्न यावर्षी भंगले होते.लॉकडाऊन ने आमची हक्काची असलेली डिनर डेट तीन वेळा खाल्ली!! माझा आणि माझ्या नवऱ्याचा वाढदिवस आणि लग्नाची ऍनीव्हर्सरी ह्या त्या तीन तारखा! पण, "सर सलामत तो पगडी पचास!!", यावर्षी नाही तर आणखी केव्हा, पण सध्या सुरक्षित राहणे महत्वाचे!

त्याचप्रमाणे वेगवेगळ्या विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांना पाहून मन हेलावत होते. आपण निदान घरात सुरक्षित आहोत, पण अधांतरी लटकलेल्या प्रवाशांची आता कशी व्यवस्था होणार असे काळजीत टाकणारे प्रश्न मनात येत होते. इतक्यात जर्मनीत अडकलेल्याना, मराठी मंडळ जर्मनी ने मदतीचा हात दिला अशी बातमी वाचली. निःस्वार्थीपणाचा आदर्शच त्यांनी घालून दिला! खऱ्या अर्थाने ते दूत म्हणून आले.त्यांचे करावे तितके कौतुक थोडेच!

लॉकडाऊन मुळे आणखी एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे अप्रत्यक्षपणे झालेले saving!!यावर्षी एकही दिवस उन्हाळ्याच्या सुट्टीचे बुकिंग केले गेले नाही.अवांतर खरेदी जसे कपडे,चपला , accessories घेतल्या गेल्या नाहीत!! अजून पुढचे काही महिने हे असेच राहील असे वाटत आहे. पण प्रकर्षाने जाणवले ते म्हणजे आपल्या माणसांची अपल्याबद्दलची असलेली आत्मीयता,प्रेम ,काळजी , जिव्हाळा या गोष्टीच आपल्या संकटाच्या काळात आपल्याला उभारी देतात.अणि आहे त्या परिस्थितीला तोंड देण्याचं बळ देतात.

लवकरात लवकर जगाला लागलेलं हे करोना च ग्रहण सुटून स्वच्छ, आनंदी जीवन पुन्हा सगळ्यांना लाभो हीच एक प्रार्थना करते आणि माझा पुढचा कॉन्फरन्स कॉल घ्यायला पळते.

अंजली लिमये
क्रेफेल्ड जर्मनी
(anjalilimaye25@gmail.com)