कोरोना, एकांतवास, आणि ध्यान - शौनक कुळकर्णी - (मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२०)
नुकत्याच परीक्षा संपून, वसंत ऋतूला सुरु होत होता. नाताळादरम्यान भारतात जाऊन आल्याने मार्च जर्मनीतच घालवायचा होता. भारतात मराठी कवींकडून फक्त लेखी वर्णन ऐकलेल्या वसंताचं युरोपातलं लोभस रूप प्रेमात पडणारं आहे, हे हळू हळू दिसत चाललं होतं. आखेन बेल्जियम आणि हॉलंडच्या सीमेवर असल्याने बृग्स- अमस्टरडॅमच्या सहलीचं तसं नियोजनही झालं होतं, पण पाहता पाहता कोरोनाचा विळखा आखेनला पडला आणि सगळं काही ठप्प पडलं. शेजारचा हायडेलबर्ग जिल्हा जर्मनीतले वूहान म्हणून ओळखला जाऊ लागला. नियमित चालू असलेला जर्मन भाषेचा वर्गसुद्धा पुढील सूचनेपर्यंत रद्द करण्यात आला. बृग्सची सहल रद्द करावी लागली. आता घरातल्या घरात काय करावं, असा मोठा प्रश्न पडला होता. पहिल्या आठवड्यात रोज नवनवे पदार्थ करून झाले, जुन्या मित्रांना/ नातेवाईकांना फोन करून झाले. इतकेच काय तर एक दिवशी अगदी दिवाळी असल्यासारखं घर स्वच्छ करून टाकलं. पण हळू हळू आता पुढे काय? हा प्रश्न सतावू लागला. दिवस पुढे जाईना. घरात स्वयंपाकाचे सर्व साहित्य होते, लॅपटॉप मध्ये भरमसाठ मोव्हीज, नेटफ्लिक्स, वाचायला उत्कृष साहित्य, अशी सगळी श्रीमंती होती. पण मनाने साथ सोडली आणि कशातच मन लागेनासे झाले. रात्रीची झोप कमी झाली. अवेळी झोपेने चिडचिड होऊ लागली. युटूबवर असेच भटकत असताना आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकरांच्या ध्यानाबद्दल कळाले, आणि एकदा प्रयत्न करून पाहूया म्हणून ध्यानाला बसलो. पहिल्या ध्यानाशेवटी आलेला आराम खूप वेगळा होता, कदाचित इतके स्वादिष्ट पदार्थ खाऊन, किंवा नेटफ्लिक्सवर पाहिलेल्या सिरीज, किंवा कॉम्पुटर गेम्सपेक्षा खूप वेगळा. एक साधे सरळ ध्यान इतका आराम कसे देऊ शकते याविषयी कुतूहल वाटले. दिवसातून दोनदा श्री श्री स्वतः ध्यानाचे थेट नेतृत्व करत असल्याचे कळल्यावर मी आखेनमधील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शाखेला संपर्क साधला. जर्मनीत येण्याधी सुदर्शन क्रिया शिकून आल्याने मी लगेच रोजच्या क्रियेच्या ओन्लाईन मिटींग्स मध्ये सामील झालो. सुदर्शन क्रियेने कमालीचे ताजेतवाने वाटू लागले. हळू हळू गोडी लागत गेली. सकाळी साडे सात वाजता आणि दुपारी तीन वाजता असे दोनदा ध्यान, आणि संध्याकाळी क्रिया अशी दिनचर्या तयार झाली. ध्यान करणे म्हणजे नेमके काय करणे? त्यातून काय लाभ होतो? याचा हळू हळू उलगडा होऊ लागला. ध्यान हा बहुदा अतिशय कंटाळवाणा किंवा क्लिष्ट असा विषय वाटतो. ध्यान हे साधारणतः मन एकाग्र करणे असा गैरसमज पसरलेला आहे. खरेतर ध्यान हे मुळात शरीराला तसेच मनाला विश्रांती देणे आहे. विश्रांती देणे हे जितके सोप्पे वाटते तितकेच कठीणही आहे. अध्यानस्थ शरीराची सर्वात विश्रांत अवस्था म्हणजे आपल्या झोपेत देखील, अनाहूतपणे आपले खूप स्नायू ताणलेले असतात. त्या स्नायूंना ताणून ठेवण्यात मनाची खूप उर्जा खर्चीली जात असते. अर्थात बऱ्याच वेळी आपण याविषयी सजगसुद्धा नसतो. ध्यान म्हणजे शरीरातील ताण मोकळा करून तो काही विशिष्ट बिंदूंवर अतिशय हलकेसे लक्ष ठेऊन विश्रांती घेणे आहे. हळू हळू ध्यानाचा सराव करत राहिल्यावर या ताणलेल्या स्नायूंविषयी आपण सजग होतो, आणि त्यांना मोकळे करणे सोप्पे होते. आता यावर अनेक प्रश्न विचारले जातात, शरीरातील ताण कसा मोकळा करायचा? स्वतःहून ध्यान करावे कि कोणाच्या मार्गदर्शनाखाली करावे? यावर उत्तर- जसे लहान मुल खेळून थकून आल्यावर त्याला जशी झोप लागते, तसेच एक विशिष्ट स्वासनक्रिया केल्यावर शरीरातील ताण सुटणे खूप सोप्पे होते. त्या क्रियेचे नाव- सुदर्शन क्रिया. एकदाका ताण सोडता आला, ध्यानाच्या नेतृत्वाच्या सूचनांचा अवलंब करणे सोपे होते. विश्रांती आपोआप घडते, आणि ध्यानाची स्थिती आपोआप येते. पुढची दिशा ध्यानाचे मार्गदर्शक ठरवतात. मुख्य ध्यानस्थस्थिती हि खूप वयक्तिक बाब आहे, आणि तिचे वर्णन करणे अवघड आहे. हि स्थिती वाचून नव्हे तर प्रत्यक्ष करूनच अनुभवायला हवी. ध्यानाने काय घडते? एकाग्रता ध्यानाचा परिणाम आहे, ध्यानाची उत्पत्ती नाही.ध्यान करत राहिल्याने हळू हळू स्वभावात चांगला बदल घडत गेला.कोरोनाच्या साथीमुळे नकोसा वाटलेला एकांतवास ध्यानामुळे अतिशय आनंदमयी झाला. पाहता पाहता एकाग्रतादेखील वाढली, अभ्यास चांगला होऊ लागला. चिडचिड नाहीशी झाली. पुढील सेमेस्टरसुद्धा ऑनलाईन झाले, याचे दुःख न होता आनंद झाला. ध्यानामुळे आलेली दैनंदिन शिस्त आयुष्याला नवे वळण देणारी ठरली. ध्यानाची गोडी लागली कि जगात अशी कोणतीच गोष्ट उरत नाही, जी आनंद देत नाही. मन आणि वृत्ती संकुचित न राहता व्यापक होते. प्रतिकूलता आपलीशी करायचे धाडस येते. शेवटी जगातील कोणतीही परिस्थिती, अनुकूल असो किंवा प्रतिकूल हि क्षणभंगुर असते. तिचा अंत निश्चित असतो. हे तत्व सगळ्यांना माहिती आहे, तरीपण हे तत्व आपण आत्मसात का करत नाही? भविष्यात काय घडेल या भीतीपाई वर्तमानात असलेल्या सुखावर विरजण पडतो. सध्याची प्रतिकूल परिस्थिती आपल्याला अनादी काळापर्यंत त्रास देत राहणार आहे, असे समजून तिला बळी का पडतो? आज ना उद्या कोरोना संपेल. हा अमूल्य एकांतवास परत मिळेल का नाही माहित नाही. शरीर बळकट करायला लोक व्यायाम करतात, मग मन बळकट करायला ध्यानसुद्धा करायला नको? कोरोनामुळे अध्यात्माचे नवे जग माझ्यासमोर उघडे झाले.
शौनक शशिशेखर कुळकर्णी
(shounakkulkarni2@gmail.com)