लॉकडाऊनशी गट्टी करूया ना - Archana Deswandikar (मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२०)
"आई उद्यापासून स्कूलला जायचं नाही, मज्जा! हे ओरडतच पिया घरात शिरली. ह्या चौथीतल्या मुलीला कोरोनावर नियंत्रणासाठी जर्मनीत मार्च महिन्यात घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे सुट्टी मिळाली, पण रोज टीचरने ऑनलाइन पाठवलेला अभ्यास घरी बसून करावा लागणार आहे,हे सुद्धा माहित होतं.पण येनकेन प्रकारेण अशी सुट्टी मिळाली ना, ह्यातच ती बया खुश! आमचे सोळा वर्षांचे चिरंजीव ...त्यांना तूर्तास तरी स्कूल्स बंद झाल्याने उशिरा उठायला मिळणार, ह्याचा जास्त आनंद. मग रोज स्कूलकडून मेल वर कितीही अभ्यास मिळो...आमची करायची तयारी. दुसरीकडे मित्रांना भेटता येणार नाही,trips नाहीत, कधी वाटलं तर बाहेरचं खाता येणार नाही, आणि friseur ची शॉप्सपण बंद...लुक maintain कसा करायचा हि चिंता!...अन नवरोबा ...त्याचं काही औरच....त्याला होम-ऑफिस तितकंसं कधीच पसंत नव्हतं. पण आता इलाज नाही.आणि त्यात पूर्ण दिवस बायकोची कटकट झेलावी लागेल(हे मनात असणारच, हा माझा अंदाज). माझ्यासारख्या गृहिणीच्या मनात मात्र पहिला विचार आला तो हाच...कोरोनाने एवढी लोकं बाधित झालीयेत व मृत्यूच्या जाळ्यात ओढली गेली आहेत.अशावेळी लॉकडाऊनमुळे सर्वजण घरी सुरक्षित तरी राहतील.'सुरक्षितता' ह्या नावाखाली मी एक उसासा टाकला.
सुरुवातीचे दोन-तीन दिवस सगळेजण घरात आहेत, ह्या कल्पनेने छान गेले. वाटले, कि लॉकडाऊनमुळे इन्फेक्टेड केसेस कमी होतील. रोज उठल्यावर worldometer वर जाऊन कोरोनाचे अपडेट्स बघायला सुरुवात झाली. इटली व स्पेन ह्या शेजारील देशांची लॉकडाऊन मधील परिस्थिती पाहून व तेथील कोविद १९ चे गंभीर स्वरूप पाहून जर्मनीत लोकडाऊनच्या आधीपासूनच लोकांचं panic buying सुरु झालं होतं. टॉयलेट पेपर्स, सॅनिटायझर व बेकिंगसाठी मैदा ह्याचा साठा करण्यावर लोकांनी जास्त भर दिला. त्यामुळे लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात ह्या गोष्टी बाजारात दिसेनाश्याच झाल्या. तेव्हा Govt ने सुपरमार्केट्स नेहमीप्रमाणेच चालू राहण्याची ग्वाही दिल्यानंतर लोकांनी हे सगळं थांबवलं. मी सुद्धा लगबगीने घरात अन्नधान्याचा व इतर उपयुक्त गोष्टींचा साठा केला कि जेणेकरून सतत सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळले जावे. काय सांगावं, हा संसर्गजन्य 'कोरोना' कधी अटॅक करेल व आपला नंबर लागेल! Lockdownच्या सुरुवातीच्या काळात जर्मनीत दिवसेंदिवस इन्फेक्टेड केसेसचा आकडा वाढतच होता.
हे पाहून माझ्यासारख्या कमकुवत मनाच्या मुलीने जरा टेन्शन घेतले आणि काहीही तेलकट-तुपकट खाण्यात आलं नसतानाही माझा घसा दुखू लागला! कसकसल्यासारखं वाटू लागलं. मग काय..लगेचच कोरोनाची लक्षणं, उपचार ह्यावर सगळं वाचून-पाहून झालं व घरगुती उपचारही ताबड्तोब सुरु झाले.साबणाने स्वच्छ हात धुवून,तोंडाला मास्क बांधून मी रोज स्वयंपाक घरात यावे, स्वयंपाक करावा, व नंतर ओटा साफसूफ करून माझ्या रूममध्ये जाऊन बसावे(I mean partially quarantine व्हावे) असं एक आठवडा routine होतं. त्यात सोशल मीडिया वर 'एन्जॉयजिंग इन लॉकडाऊन’च्या लोकांच्या पोस्ट्स पाहिल्या कि वाटायचं आपल्याच बाबतीत तेवढं काही बरं नाही चाललं. नाही म्हणायला, मुलाने समजावलं,"आई,तुला वाटतं तसं काही नसणार आहे. Weather changeचा इफेक्ट असणार आहे". नवऱ्याला माझा भित्रट व कमकुवत स्वभाव माहित असल्याने माझ्या कोरोनाच्या संशयावर काहीही गांभीर्य नं दाखवता उलट त्याने खिल्ली उडवणे सुरु केले. “अरेरे! खोकला! हा तर कोरोनाच!" "बापरे! तुला शिंका आली! हि तर कोविद १९ ची लक्षणं...!" अशातच एक दिवस छान ऊन पडलं म्हणून मुलं वॉकला जाऊ म्हणू लागली. 'मला बरं नाहीये..तुम्ही तिघं जावा’ हे माझं म्हणणं नवऱ्याने ऐकूनच न घेता मला त्यांच्याबरोबर घराबाहेर काढलं. माझ्या भीतीत भरीस भर म्हणून सोसायटीच्या बाहेर आल्यानंतर समोरच मोठ्ठा बोर्ड दिसला...'कोविद १९ टेस्टिंग सेंटर!’ आमच्या सोसायटीतून बाहेर आलं कि समोरच एक Gesamtschule आहे. त्या स्कूलच्या आवारात हे सेंटर ओपन केलं होतं. सेन्टरच्या गेटातच सर्व शरीर पॅकबंद करून, तोंडाला मास्क लावून उभे असलेले security guards, रुग्णवाहिका, गाड्यांतून कोविद टेस्टिंग साठी येणारे काही लोकं आणि त्यातच सर्वत्र स्मशानासारखी शांतता असलेलं वातावरण! ...हे सर्व पाहून एका क्षणात मला घाम फुटला. ते गंभीर स्वरूप पाहून मी खडबडून जागी झाले. साध्या साध्या मेडिकल ट्रीटमेंटला घाबरणारी मी! हे कोविदचं टेस्टिंग, ट्रीटमेंट मला विचार करण्याच्या पलीकडचं होतं. मग मी ठरवलं कि आपल्याला कोरोना बहुदा झालाय, होईल, होऊ शकतो हे मनात न आणता सर्वतोपरी काळजी घेऊन लॉकडाऊन मध्ये आपल्या कुटुंबाबरोबर राहायचा पूर्ण आनंद उपभोगायचा. आता मनातील नकारात्मकतेची जागा सकारात्मकतेने घेतली होती.
"सुबह हो गई मामू" असं म्हणत दुसऱ्या दिवसापासून एक नवीन सुरुवात केली. सर्व प्रथम टाइम टेबल तयार झालं. रोजचा व्यायाम, नाश्त्याला व जेवायला वेगवेगळे पदार्थ करणं, रात्रीचं जेवण झालं कि पत्ते,कॅरम, मोनोपॉली खेळणं, वाटल्यास एखादा बऱ्याच वेळेपासून पेंडिंग असलेला पिक्चर पाहणं, असं सुरु झालं. सर्वजण घरी असल्याने ३ वेळच्या खाण्याऐवजी मधेमधे सटरफटर खाण्यात भर पडलीच. अशावेळेस भांड्यांसाठी डिशवॉशर तरी किती सतत लावणार. मग हे ऍडिशनल काम मुलांना वाटून घेण्यास सांगितलं. "एक्सट्रा पडलेली भांडी आपल्यालाच घासावी लागतात व त्यामुळे ग्लासेस, बाउल्स एक्सट्रा काढू नकोस हं",असं दोघं एकमेकांना समजाऊ लागले. नवऱ्याला कधी कधी नाश्त्याचे हलके-फुलके पदार्थ बनवण्यास सांगितले गेले तेव्हा फोडणीच्या डब्याची काय अवस्था झाली हे सांगणे नकोच! एकानेच बाहेर पडून ग्रोसरी आणणे आणि मग सर्वांनी मिळून ग्रोसरी डिसइन्फेक्ट करून सेग्रीगेट करून ठेवणे, भाज्या स्वच्छ धुवून ठेवणे असे रुटीन झाले. घरातच कायम सर्वजण असल्याने सर्वांचीच घरातली कामं करायची frequency वाढली. माझा आरडाओरडा सहन करण्यापेक्षा तिथल्या तिथे लगेचच गोष्टी जागेवर ठेवून आपापल्या रूम्स स्वच्छ ठेवणे मुलांना परवडू लागले. ह्या सर्व कामांसाठी आधी कुरकुरणाऱ्या ह्या मुलांनी तत्परता, टापटीप, घरकाम व स्वच्छतेशी हळहळू आपली मैत्री करून घेतली.
हे सर्व सुरु असतानाच एकीकडे भारतातदेखील कोरोनाच्या प्रसारामुळे लॉकडाऊनची घोषणा झाली. परत मनात एक अनामिक भीती जागी झाली. आपले आई वडील, सगेसोयरे व भारताचाच कसं होणार? म्हाताऱ्या लोकांना तर कोविद १९ पासून जास्त धोका! आपण आपल्या वयस्कर आईवडिलांपासून लांब...मनात एक प्रकारची अपराधाची भावना अशावेळेस जागी झाली. मग रोज आईवडिलांशी काहीतरी चांगल्या विषयावर व्हिडीओ कॉल करून गप्पा मारणे सुरु झालं. थोडक्यात काय तर एकमेकांनी परस्परांना तुम्ही आमची काळजी करू नका, आम्ही आहोत तिथे सुखरूप आहोत, हा अप्रत्यक्षरीत्या संदेश देणं सुरु केलं. जर्मनीत वॉकला बाहेर पडायला बंदी नव्हती पण भारतात मात्र त्यावरही बंदी! त्यावेळी भारतात मोदीजींच्या सरकारने एक छान आयडिया काढली कि जेणेकरून लोकं घरीच बसून राहतील व बाहेर पडणार नाहीत. रामायण, महाभारत ह्यांसारख्या पूर्वी प्रचंड लोकप्रियता मिळालेल्या सिरियल्स दाखवायला सुरुवात केली. आम्ही पण मग 'News On Air' हे ऍप इन्स्टॉल करून रामायण-महाभारत पाहायला सुरुवात केली. ह्यांतील मुलांना आधी कथन केलेल्या गोष्टी Tv वर प्रक्षेपित होत असल्याने जास्त चांगल्या रीतीने आत्मसात होत होत्या. त्यांनीही त्यात रस घेऊन खोलवर माहिती विकिपीडिया व इतर वेबसाईटसवर वाचून काढली. आपली मुलं इथं राहूनही आपल्या प्राचीन ग्रंथांबद्दल एवढी जिज्ञासू आहेत, हे मला तेव्हा जाणवलं.
सोसायटीतहि सगळे घरीच. रोजच्या धकाधकीच्या जीवनात एरवी स्मितहास्य करून हाय, हॅलो, Guten Tag, Guten Morgen म्हणणारे आम्ही शेजारी एकमेकांची सवडीने विचारपूस करू लागलो. जेव्हा छान हवा असेल तेव्हा सिंगल्स मध्ये बॅडमिंटन खेळू लागलो. हे सर्व अर्थातच लॉकडाऊनचे नियम पाळूनच.
एकीकडे इथल्या नेहमी भेटणाऱ्या मित्र-मंडळींना ZOOM वर भेटून गप्पा मारणं, ठराविक दिवशी म्युझिकल प्रोग्रॅम करणं, स्तोत्रपठण करणं हे पण रुटीनचा एक भाग झालं. व्हाट्स ऍप वर कोडी सोडवणं, फेसबुकवरच्या हरतऱ्हेच्या challanges च्या पोस्ट्स पाहणं हे पण सुरू होतच. ह्यातून स्वतःबरोबरच इतरांनाही सकारात्मक गोष्टींमध्ये गुंतवून ठेवण्यात एकमेकांनी हातभार लावला. मनात आलं, हे लॉकडाऊन माणसाला माणसापासून दूर ठेवण्यासाठी केलं खरं...पण त्याने माणसं एकमेकांच्या दूर नं जाता अंतःकरणाने एकमेकांच्या जवळच आली.
मे च्या सुरुवातीलाच जर्मनीने स्टेप बाय स्टेप लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय पण घेतला. कारण आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली होती. अर्थात सोशल डिस्टंसिन्ग व मास्क चा वापर चालू ठेवूनच. जर्मनीने इतक्या कमी कालावधीत म्हणजे अवघ्या दीड-दोन महिन्यांत बऱ्यापैंकीच कोरोनावर मात केल्याचं सर्व जगालाच नवल वाटलं. ह्या सगळ्याचं श्रेय जातं ते अर्थातच इथल्या Govt.ची दूरदृष्टी, समयसूचकता, कोरोनाला घालवून लावण्याकरता लादलेले निर्बंध, सुसज्ज वैद्यकीय यंत्रणा, नागरिकांमध्ये अंगीभूत असलेली शिस्तबद्धता, सामाजिक जागरूकता व जवाबदारीची जाणीव इ. त्यामुळे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत इथल्या सरकारने व जनतेने कोरोनाला बहुतांशी निगेटिव्ह केलं, असं म्हणायला हरकत नाही.
Lockdown संपायच्या आधीच माझी घरची बाग पहिल्यांदाच आम्ही चौघांनी मिळून लावलेल्या भाज्यांनी व फुलझाडांनी छान बहरली होती व त्यामुळे पक्ष्यांची किलबिलदेखील जोरात सुरु होती तर एकीकडे घरात मुलांची किलबिल! ह्या वातावरणाने माझे घर व आंगण अगदी कसं बहरून गेलं. तेव्हाच मी माझ्या मनात म्हंटलं होतं...
अर्चना ...कोरोना से डरोना...लॉकडाऊन से गट्टी करोना !!!
Archana Deswandikar
(archanahd@gmail.com)