मी एक अष्टपैलू भारतीय जर्मन - आनंद बापट (मराठी कट्टा दिवाळी सिरीज)

जर्मनी म्हणले की शिस्तप्रिय, टेक्निकल क्षेत्रात अग्रगण्य, औद्योगिकीकरण आणि पर्यावरण यांचा समतोल राखणारा देशच म्हणायला पाहिजे. क्रिकेट क्षेत्रात यासारखे उत्तम उदाहरण माझ्या पाहण्यात आणि आठवणीत जे आहे ते म्हणजे  ग्लेन मॅकग्राथ. शिस्तीत एका लायनीत न चुकता एकापाठोपाठ एकाच लाईन आणि लेंथवर बॉल टाकण्याची क्षमता  याची होती जशी जर्मनीची आहे. जरा इकडे किंवा तिकडे नाही. परफेक्ट सरळ रेषेत.

तर अशा या जर्मनीमध्ये काम करण्याची आणि राहण्याची संधी मिळते आहे हे समजताच मी न विचार करिता ती स्वीकारली. लहानपणी शिकत असताना मला नेहमी जर्मन इंजिनिअरींग आणि मर्सिडीज गाड्या यांचे खूप कुतूहल होते. आता गेली अनेक वर्ष इथल्या इंजिनीअर्सबरोबर काम करून  ते कुतूहल नाहीसे झाले आहे आणि त्याची जागा आता कौतुक आणि अजुन नवीन काय करता येईल या प्रश्नाने घेतली आहे.

बहुतेक २००७ साल असावे. शरद ऋतू होता. त्या काळात निसर्ग एका आगळ्या वेगळ्या साजात नटलेला असतो. मंद गारवा आणि निसर्गाचे रंग यांचे एक अतिशय सुंदर वातावरण होते. अशा शरद ऋतूमध्ये मी एका कस्टमर मिटिंगसाठी माझ्या जर्मन कलीग बरोबर पोचलो, स्टार लोगोचा कंपनीमध्ये. सगळ्यात प्रथम जे मनाला स्ट्राइक झाले ते वेळेत मिटिंग सुरु होणे. आमचा कॉन्टॅक्ट, आमची सिस्टममध्ये एन्ट्री झाल्यावर पाच मिनिटे आधी आला. मिटिंग रूममध्ये जाताजाता कॉफी आणि पाणी घेऊन गेलो. मिटिंग सुरू झाली तेव्हा उगाचच इकडच्या तिकडच्या गप्पा वगैरे काही नाही. मुद्द्यावर बोलणे आणि मुद्द्यावरचे प्रश्न. शिकण्यासारखे असे होते की मुद्द्यावर राहून मिटिंग कशी करतात.  आता ही पद्धत अगदी भिनली आहे दैनंदिन व्यवहारात. इथल्या वेदर बद्दल अजून थोडे लिहायचे तर इथे चार ऋतू अगदी वेगळे वेगळे बघायला मिळतात. शरद ऋतू सुरू झाला की कपडय़ांचे थर वाढत जातात थंडी संपेपर्यंत. वसंत आला की थर कमी कमी होतात आणि उन्हाळ्यामध्ये एकदम “फ्री टू एअर”. प्रत्येक ऋतूमध्ये निसर्ग वेगळा दिसतो आणि त्याप्रमाणे लोकांच्या मनातील निसर्ग पण बदलत असतो. इथल्या रुटीनसाठी एक गाणे एकदम चपखल आहे “पतझड सावन बसंतबहार एक बरस के मौसम चार…”.

इथल्या सरकारी सिस्टमची गाठ पडली जेव्हा “Anmeldung” आणि वर्क परमिट फॉरमॅलिटीज करायच्या होत्या.  रीतसर अपॉइंटमेंट घेऊन आम्ही सगळे गेलो होतो “Stadt” ऑफिसमध्ये. एकेकाच्या फॉर्मॅलिटी चालू होत्या. माझ्या मुलाचा नंबर आला. त्यावेळी तो अगदी लहान होता. त्याच्या डॉक्युमेंट वर मला आणि बायकोला सही करायला सांगितले. एकदम माझा मुलगा म्हणाला “मी का नाही सही करायची. माझा फॉर्म आहे ना?”. हे ऐकून आमची ऑफिसर म्हणाली त्याला “तु कर सही”. हे ऐकून तो खूश झाला व त्याने त्याच्या पद्धतीने नाव लिहिले. मग आम्ही आई वडील म्हणून सही केली त्याच्या नावानंतर. त्या ऑफिसरने त्याचे खूप कौतुक केले आणि त्याला चॉकलेट बक्षीस म्हणून दिले. आमचे हसतखेळत काम झाले अगदी पंधरा मिनिटात. सिस्टम किती प्रबळ आहे याची ही प्रचिती होती.

एकदा आम्ही Königstrasse ला गेलो होतो. बरेच फिरून झाले आणि मग आम्हाला भूक लागली. गुगल मॅपवर एक इटालियन रेस्टॉरंट शोघले आणि तिथे पोहोचलो. शनिवार असल्याने गर्दी होती. आम्हाला अर्ध्या तासाचे वेटिंग होते. आम्ही रेस्टॉरंटबाहेर थोडे बाजूला जाऊन उभे राहिलो. मुलांना खूप कंटाळा आला होता आणि भूकही लागली होती. ती खूप त्रास देत होती. आमच्या बाजूला एक तरुण जर्मन जोडपे उभे होते. ते आमचा हा गोंधळ बघत होते. थोड्या वेळाने त्यांचा नंबर आला. त्यांनी आमच्याकडे बघून एकदम विचारले “तुम्हाला आधी जायचे आहे का? असे दिसत आहे की तुमच्या मुलांना खूप भूक लागली आहे.?”  आम्ही दोघेच आहोत आणि आम्ही अजून थांबू शकतो. मी म्हणालो “असू दे, तुमचा नंबर आहे ना.” पण त्यांनी परत म्हटले “तुम्ही जा आणि एन्जॉय करा.” आम्ही त्यांना धन्यवाद देऊन आत गेलो. जेवण यथासांग पार पडले. त्या दिवशी इथल्या लोकांची आत्मीयता आणि धीर हा इथे राहण्यासाठी आधार देऊन गेला.

एकूण मी बऱ्याच वेळा ऐकले होते की जर्मन लोक थोडे अलिप्तच असतात आणि बाहेरच्या लोकांना आपल्यात सामावून घेत नाहीत. पण मला वेगळा अनुभव आला. याचे कारण होते माझे कलिग. त्यांनी आमचे घर सेट करायला खूप मदत केली. मला घर बघायला मदत करण्यापासून ते फॅमिली आल्यावर घरात सगळ्या वस्तू आणेपर्यंत. कुठेच मला काही कमतरता पडू दिली नाही. आमच्या घराच्या आसपास कुठे काय मिळते, कुठे रेस्टॉरंट्स आहेत, कुठे स्टेशन आहे असे बरेच काही सांगितले आणि दाखवले. “Starting trouble” त्यामुळे आम्हाला जाणवलाच नाही. ते आज आमच्या एक्स्टेंडेड फॅमिली चा भाग झाले आहेत. आम्ही त्यांना दिवाळी आणि गणपतीला हमखास बोलावतो. मोदक आणि चकली त्यांना फार आवडतात. आम्हाला ते “Easter” आणि ख्रिसमसला बोलतात त्यांच्याकडे. अशी ही संस्कृतीची आदानप्रदान म्हणजे खरीखुरी “ग्लोबल सिटिझनशिप”.  (Global Citizenship)

चकली मोदक यावरून इथल्या कुझिन बद्दल पण बोलायला हवे. इथे पण खाण्याचे विविध प्रकार आहेत. सहज ते माहीत होत नाहीत. थोडी मेहनत करावी लागते. शाकाहारी पदार्थ आता खूप मिळतात. मला आठवते की काही वर्षांपूर्वी शाकाहारी पदार्थ हे शोधून मिळायचे नाहीत. फक्त ब्रेड आणि सॅलड एवढेच मिळायचे. पण अलीकडच्या काळात जसे खरेखुरे ग्लोबलायझेशन होते आहे तसे तसे व्हेजिटेरियन पदार्थ मेन्यूमध्ये आपली जागा वाढवत आहेत. ब्रेडवरून आठवले की इथे अनेक प्रकारचे ब्रेड आणि केक मिळतात. हे सगळे ब्रेड पौष्टिक असतात कारण त्यात सगळे नैसर्गिक पदार्थ वापरलेले असतात. चवी पण वेगळ्या असतात. आपण फक्त तोंडाची चव आणि मनातील रूढ असलेले विचार बदलून त्याचा आस्वाद घ्यायचा असतो.

मला जाणवले की या देशामध्ये अशी शिक्षण पद्धती प्रचलित आहे ज्यामुळे पालकांवर आणि विद्यार्थ्यांवर कसलेही दडपण नसते. प्रत्येकाच्या कुवतीनुसार तो पुढे जात असतो आणि स्वतःला चांगले आयुष्य जगण्यालायक बनवत असतो.

मी पुण्याचा असल्याकारणाने एक ऑब्झर्वेशन असे आहे. पुण्यातील पेठा आणि इथल्या “Berg’s” मध्ये रहात असलेल्या लोकांमध्ये खूप खूप साम्य आहे. चिक्कूपणा आणि “आम्हाला सगळे कळते” हा भाव इथे पण बघायला मिळतो. दुनिया गोल आहे हेच खरे आहे.

तर असे बरेच किस्से, गोष्टी, विचार आहेत. लिहायला वेळ आणि शब्द कमी आहेत. पण एवढे नक्की आहे, हा एक समृद्ध देश आहे, इथे प्रत्येक माणसाला महत्त्व आहे.  काम हे पूर्ण आणि व्यवस्थित कसे होईल यासाठी इथली माणसे झटत असतात. एकदा काम झाले की “आता झाले” म्हणून शांत बसत नाहीत. अजून काय बदल करून आणखी ते कसे चांगले करता येईल हा प्रयत्न असतो. स्वच्छतेची खूप आवड आहे, रिसायकलिंग ची विशेष पद्धत आहे. बिअर आणि “Sausage” आवडते आहेत. या सगळ्या इथल्या चांगल्या गोष्टी आणि आपली भारतीय संस्कृती यांचे एक तिखट गोड मिश्रण असलेली “अष्टपैलू भारतीय जर्मन” (एकदम क्रिकेटला शोभेल असे) माणसे म्हणून जगण्याचा एक वेगळाच आनंद आहे. तर भेटूया परत असेच कधीतरी...!

आनंद बापट
स्टुटगार्ट, जर्मनी
(nndbapat@gmail.com)