।। दिवाळी 2020 ।। - अपूर्वा वाणी अमृतकर (मराठी कट्टा दिवाळी सिरीज)

थंडीची चाहूल लागली अन मी जर्मनीत याच शुभमुहूर्तावर सीमोल्लंघन केलं.रोजची सकाळी 7.14 ची लोकल अन ते धकाधकीच वेळापत्रक थोडंस बाजूला सारून मी नव्या उमेदीने युरोपात  प्रवेश केला. अर्थातच Schengen व्हिसा असल्याने युरोप भ्रमंती चालू झाली .नव्याचे नऊ दिवस दिवस काही संपेना. आशिया, युरोप आणि नंतर थेट ऑस्ट्रेलिया पादाक्रांत केल्यानंतर माझी गाडी जरा रुळावर येऊ लागली.

जर्मनीने शिक्षण क्षेत्रात अनेक शतकांपासून विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. जर्मनीमधील विद्यापीठांचे ज्ञानदानाबरोबरच संशोधन हे एक महत्त्वाचे काम आहे. बहुतेक सर्व विद्यापीठांचा भर संशोधनावर असतो.  विद्यापीठे स्वतःच्या क्षमतेवर उत्पन्न मिळवून आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात. विद्यापीठे व संशोधन संस्था या राष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. यामुळे जर्मनी केवळ उच्च गुणवत्तेची उत्पादने बनवण्यात अग्रेसर नसून जगाला तंत्रज्ञान पुरवण्यातही आघाडीवर आहे. तसेच उत्पादक देखील आपले उत्पादन सतत चांगल्या दर्जाचे आणि फायदेशीर कसे बनेल यावर सातत्याने संशोधन करत असतात.जर्मनीत प्रत्येकसाठी शिक्षणाची दारे अनेकोत्तम  आहेत .फरक इतकाच आहे तुमची आवड अन निवड. अगदी इथल्या माध्यमिक शाळेपासूनच याची पाळंमुळं रोवली गेलीत. सरसकट सगळ्यांचा कल हा फक्त डॉक्टर इंजिनिअर न होता स्वःताच्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे.सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा तुम्ही परदेशातून जर्मनीत येता तेव्हासुद्धा तुमच्याकडे असंख्य पर्याय उपलब्ध असतात. या अतिशय शिस्तीत आणि नियोजनबद्ध बांधलेल्या कार्यात आपले योगदान द्यावयाचे असेल तर जर्मन भाषेचे कायदेशीर शिक्षण आवश्यक आहे.अगदी तांत्रिक (technical) जागा वगळल्या तर  बाकी सर्व ठिकाणी व्यवहार हा जर्मन भाषेतूनच चालतो.जर्मनीत तग धरण्यासाठी भाषा ही पहिली पायरी आहे. आजकाल  इंग्लिशमध्ये बऱ्याच ठिकाणी सर्रास संवाद होतात पण प्रथमतः पावलोपावली गरज पडणारी भाषा जी येणे गरजेचे नव्हे तर अनिवार्य आहे असं जाणवताच माझा ही जर्मन शाळेचा प्रवास Volksschule पासून सुरु झाला.

या कोर्सच वैशिष्ट्य अस की यात तुमची सुरुवात अगदी बेसिक जर्मन पासून होते.इथला माझा मजेशीर अनुभव म्हणजे मला जर्मन अगदी काहीच समजत नव्हतं पण इंग्लिश येतं आणि याचा नक्की फायदा होईल असा विचार करून मी हुशारीने एन्ट्री घेतली  पण पहिल्याच दिवशी माझ्या बॅच मध्ये एकालाही इंग्लिश चा गंध नव्हता हे उमगल्यावर मात्र चांगलाच हिरमोड झाला आणि मी विचारचक्रात अडकले ,ना त्यांचं एवढे वर्षात काही अडलं आणि ते तरीही जर्मनीत म्हणजेच परदेशी आले मग  फक्त आपल्याकडेच इंग्लिशचं इतक स्तोम  माजवलं आहे का? असो.सुरुवातीला हातवारे करत किंवा फक्त क्रियापद समजून (वाक्यरचनेचा घोळ तर स्वतःला समजला तरी भरपूर) आमच्या मैत्रीला सुरुवात झाली.माझ्या शाळेत अगदी साठ वर्षाच्या आजी सुद्धा अत्यंत हिरीरीने शिकत होत्या.या शाळेचा मुख्य उद्देश म्हणजे जर्मनीचा सखोल अभ्यास. थोडक्यात काय तर इतिहास,भूगोल, संस्कृती,राजनीती याची देवाणघेवाण. कारण प्रत्येक जण  एका वेगळ्या देशातून वेगळ्या संस्कृतीतून आले होते.प्रत्येकाचे अनुभव चालीरीती ही तेवढ्याच अवर्णनीय.शाळेत भूगोलातही  इतके निरनिराळे देश मला इतक्या बारकाईने कधी समजले नव्हते. यासोबतच माझा एक नवीन छंद सुरू झाला , रोज एका सोबत संवाद साधून मग घरी येऊन तो देश गुगल मॅप्स वर आणि त्या देशाची थोडी फार माहिती इंटरनेट वर  शोधायची.लहान लहान देश शोधतांना तर   अगदी  खजिना सापडल्यागत आनंद मला मिळत होता.आपल्या देशाबद्दल दुसऱ्या देशातील लोक इतक्या उत्कंठतेने माहिती घेतात त्यामुळे अगदी सहजरित्या मैत्री होत होती.इथल्या लोकांचा मला मोकळेपणा सर्वात अधिक भावला.जसं गुणगान गातील तसंच चुकाही बिनधास्त दाखवतील.एकदम रोखठोक. कसलाच अट्टहास अजिबात नाही. पाककृतीतील विविधता ही इथे एक वेगळाच अनुभव देऊन गेली. केक, बिस्कीट ,पावाचे विविध प्रकार असे अनेक  (आपल्या भाषेत फक्त गोडाचे/  मैद्याचे) पदार्थ कळले .आपलं अगदी साधं जेवण सुद्धा त्यांनी bisschen scharf म्हणत फस्त केलं तेव्हा यात तिखट /मिरची किती घातली होती हा माझ्यासाठी त्यादिवशी गहन प्रश्न होता.आधी जर्मन साठी टाळाटाळ करणारी मी नंतर मात्र कधी या सगळ्यात रममाण झाली हे  माझं मलाच उमगलं नाही.
या कोर्सचा एक मोठा फायदा म्हणजे  माझं circle थोडं मोठं झालं.वेगवेगळ्या देशातले वेगवेगळ्या पदावर कार्यरत असलेले अनेक जण जर्मन क्लास ने जोडलें गेले होते.नमूद करायचंच झालं तर अगदी नासा मध्ये पूर्वी कार्यरत असलेले एक शास्त्रज्ञ ते एक रशियन लेखिका.त्यांचे अनुभव ऐकतांना अजूनच मन समृद्ध होत होतं.अर्थातच तोपर्यंत समजेल इतकं जर्मन सगळ्यांना येत होतं.Volksschule मध्ये विविध भाषांचे कोर्स  आहेत.अगदी काही ठराविक शहरात तर हिंदी भाषेचे सुद्धा वर्ग भरतात. योगा पासून झुंबा पर्यंत इथे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.काही technical कोर्सेस ही आहेत.माझी साठ वर्षाची मैत्रीण जेव्हा स्वतः केलेलं presentation सादर करत होती तेव्हा तिच्या डोळ्यातला तो आनंद बघून आम्हा सर्वांचं मन अगदीच भारावून गेले.किती तो सळसळता उत्साह आणि सतत नवीन शिकण्याची धडपड.हे सगळं होत असताना एक प्रकारचा बिनधास्तपणे वावरण्याचा आत्मविश्वास आमच्यात येत होता.आमच्याच नकळत आम्ही थोडा फार जर्मन बोलत होतो.विविध कार्यालयात एकट्याने काम निभावत होतो.अगदी नावाप्रमाणे या कोर्समूळे जर्मनीने आपल्यात सामावून घेण्यासाठी आम्हाला मदत केली.
जर्मनीत स्थायिक व्हायचा मानस असेल तर नक्कीच भाषा उपयोगी येते.महत्त्वाचे म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीपासूनच इथल्या सरकारने जर्मन PR आणि जर्मन पासपोर्टसाठी  काही भाषेच्या अटी लागू केल्या आहेत.काही जण विशेषतः पुणेकर भारतातून येतांनाच जर्मन शिकून येतात. त्यांना निश्चितच इथे आल्यानंतर जुळवून घेण्यासाठी सोपं जातं. कितीतरी भारतीय देखील स्वतः जर्मन शिकवतात याचा सर्वाधिक प्रत्यय मला लोकडाऊन मध्ये फेसबुकवर आला.
जर्मन भाषेचे अनेक कोर्सेस हे शासनाच्या अधिपत्याखाली येतात.त्यामुळेच सवलत दरात याचा लाभ घेता येतो .आजकाल ऑनलाइन ही मोठ्या प्रमाणात खूप कोर्सेस  आहेत.Hochschule म्हणजेच जर्मन युनिव्हर्सिटी मध्ये सुद्धा जर्मन भाषेचं पुढील शिक्षण मोठ्या प्रमाणात दिलं जातं. जे विद्यार्थी मास्टर्स साठी येतात त्यांनाही यासाठी सुविधा उपलब्ध आहेत.पहिल्यांदा मी या युनिव्हर्सिटीत गेले तेव्हा याची प्रचिती अजूनच आली.फक्त थोडा वेळ खर्च होतो. भाषेचा अट्टहास जरी असला तरी असंख्य पर्याय तुम्हाला खुणवत असतात.त्यामुळे आपसूकच तुमची पाऊले पुढचं शिखर पादाक्रांत करतात.थोडक्यात काय तर पाट्या न बदलता भाषा शिकवण्याचं तंत्र आणि मातृभाषेचा सार्थ अभिमान बाळगणं हा मंत्र आपण जर्मनीकडून नक्कीच शिकलं पाहिजे.

अपूर्वा वाणी-अमृतकर
फ्रँकफर्ट