Quarantine, स्टुटगार्ट आणि पु ल - ओंकार नाडगीर (मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२०)

चार दिवसांच्या सुट्टीनंतर आम्ही काल स्टुटगार्ट हुन एर्लान्गेन ला येत होतो. एकतर लॉन्ग वीकेंड, त्यात जरा शिथिल झालेले quarantine. त्यामुळे तसा नेहमी रिकामा असणारा हा रस्ता बराच बिझी वाटला. जर्मनी मधलं आमचं जवळपास निम्मं वास्तव्य स्टुटगार्ट मध्ये झाल्यामुळे त्या शहराशी एक निराळंच नातं जोडलं गेलंय. त्यामुळे एर्लान्गेन ला येऊन एक वर्ष होऊनदेखील स्टुटगार्ट ला जायचे आणि तिथल्या मित्रमंडळींना इकडे बोलवायचे आमचे प्लॅन्स सारखे सुरु असतात. गेले ३-४ महिने quarantine मुळे होम ऑफिस आणि फक्त आठवडी बाजार सुरु असल्याने माणसांशी आमचा संपर्क जवळपास शून्य झाला होता. त्यात भर म्हणून एर्लान्गेन सारख्या लहान गावात quarantine आणि नॉर्मल रविवार हा सारखाच असतो. नाही म्हणायला नेटफ्लिक्स सारख्या एप्सनी आयुष्य तसं सुकर केलं होतं, पण नंतर त्याचा पण कंटाळा आला. म्हणून हा वीकेंड स्टुटगार्ट मध्ये घालवायचा हे आमचं बरंच आधि ठरलं होतं. जसे प्लॅन केले होते तसेच हे दिवस मस्त गेले आणि नको असताना सुद्धा रविवारी दुपारी आम्हाला परत एर्लान्गेन ला निघावं लागलं. जसं जसं आम्ही घराच्या जवळ येत होतो तसं तसं हे quarantine चे गेले ३-४ महिने डोळ्यासमोरून तरळत होते.

कोरोना चा प्रभाव जेव्हापासून सुरु झाला तेव्हापासून सर्वांचे आयुष्य पार बदलून गेलं. चीन इटली व स्पेन नंतर जर्मनी मध्ये हा न दिसणारा राक्षस येणार हे गृहीतच होते. या विकसित देशाने सुद्धा आपल्या इमेज ला साजेल अशाच पद्धतीने ही युनिक सिच्युएशन मॅनेज केली. लिमिटेड लोकसंख्या, चांगली healthcare सिस्टिम आणि अतिशय organised लोक यामुळे हे challenge जर्मनीने चांगल्या पद्धतीने पेलले. या एकांतवासामध्ये एक गोष्ट खूप तीव्रतेने जाणवली की आपली शारिरीक आणि मानसिक तंदुरुस्ती हि आपली सर्वात मोठी संपत्ती आहे. शारिरीक तंदुरुस्ती ही आपण एकटे राहून मिळवू शकतो, पण मानसिक तंदुरुस्ती साठी आपल्याला लोकांमध्ये मिसळावंच लागतं. म्हणून ज्याचे खूप सारे मित्रमैत्रिणी असतात ते नेहमीच खूप नशीबवान असतात आणि आम्ही नक्कीच त्यातले एक आहोत.

असे खूप काही रँडम डोक्यात सुरु असतानाच प्लेलिस्ट वर पुलंचं नामू परीट सुरु झालं आणि डोक्यात प्रकाशाचा अण्णू गोगट्या झाला ! तसं कर्नाटकी आडनाव असूनसुद्धा बॉर्न आणि ब्रॉट अप महाराष्ट्रातला असल्याने - मनसेच्या घटनेनुसार - मी मराठीच आहे आणि त्यामुळे पुलंची सगळी पुस्तकं अगणितवेळा कोळून पिलीत. त्यामुळे रत्नागिरीच्या त्या मधल्या आळीतल्या अंतूशेट पासून बेळगावचे कृष्णराव हरिहर उर्फ रावसाहेब आणि सख्यापासून चितळे मास्तरापर्यंतची सगळी पात्रं चुटकीसरशी ओ देतात. हे सगळे लोक जणू काही आपल्या आयुष्यात अजूनही आहेत असं मला नेहमी वाटत असतं आणि हे फक्त पुलंच करू शकतात. त्यांना फक्त माणसाचं वेड होतं आणि त्यांनी त्यांच्या लिखाणातून मानवी स्वभावाचा जणू स्वर्ग उभा केला. एखाद्या माणसाची आणि आपली वेव्हलेंग्थ जमल्यावर काय होतं हे जसं त्यांनी सांगितलं तसंच एखाद्या गोष्टीची वीट केव्हा येते हे सुद्धा दाखवलं. जीवनाच्या समरात रक्तबंबाळ व्हायचे प्रसंग आले काय, किंवा बससमोर म्ह्स आडवी आली काय, किंवा नवरदेवाने लग्नाच्या दिवशी हातरुमालासाठी हट्ट केला काय, कुठल्याही प्रसंगाला तोंड दिल्याशिवाय नाही राहायचं, खंडो बल्लाळांचं रक्त आहे हे आपल्या मनावर ठसवलं. या सगळ्या गोष्टींमधून जर काही बोध घ्यायचा असेल तर तो एव्हढाच आहे की आपल्या या आयुष्यात माणसं जोडणं आणि टिकवून ठेवणं हि कला ज्याला जमली तो तरला. दैनंदिनरित्या खूप सारी माणसं आपल्याला भेटत असतात, काही ऑनलाईन, काही ऑफलाईन, काही वारंवार, काही प्रसंगानुरूप, काही मुंबईकर, पुणेकर किंवा सांगलीकर. पण सर्वांचे एकमेकांच्या कथेत काहीतरी रोल्स असतात आणि त्या कथा समांतर सुरु असतात. तर जेव्हडं जमेल तेव्हडं आपला रोल उत्तमपणे निभावून आपण पुढच्या स्क्रिप्ट साठी वाट बघणे एव्हडंच आपलं काम असावं.

सध्या कोरोना मुळे खूप जणांसाठी खूप कठीण काळ आहे. आर्थिक, शारीरिक आणि मानसिक अशा तिहेरी लेव्हल वर आघात करू शकेल असं पहिलंच challenge आपल्या पिढीसमोर आलंय. त्यामुळे आपल्या आजूबाजूला कुणाला काही कमी जास्त आहे का हे बघत राहून जमलं तर जादूची झप्पी, किंवा सोशल डिस्टंसिन्ग पाळून एक जादूची स्माईल देऊन काहीही लागलं तर मी आहे हे सांगणं, एव्हडंच सध्याच्या स्क्रिप्ट मध्ये आहे. बघू मग आपलं picture पुढं काय काय दाखवतंय ते !

कळावे, लोभ असावा.

ओंकार नाडगीर
(omknadgir@gmail.com)