सेम टू सेम - योगेश गवस (मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२०)

विकसित देश आणि विकसनशील देशात यात जर फरक आणि साम्य काय अस मला कोणी विचारलं तर मी सांगेन की विकसित देश म्हणजे ' a lot of stupid people with money' आणि विकसनशील देश म्हणजे 'lots of stupid people without money' !

का म्हणाल तर कोरोना काळात जर्मनी सारख्या विकसित देशात राहून असे काही माणसांचे नमुने बघण्यात आले की त्यांना भेटून वाटायचं अरे हे आमच्या इकडचे दाजी काका असेच वागायचे किंवा अरे आपला मन्या सेम असाच मूर्खपणा करायचा. तस जर्मनीतील लॉकडाऊन म्हणजे धूम 3 मधल्या अभिषेक बच्चन सारख होत,  आमिरच्या व्हिलन सारख एकदम कडक पण नाही आणि उदय चोपडा सारख एकदम मिळमिळीत पण नाही. तरी या सगळ्या उद्रेकाच्या सुरुवातीच्या महिन्यात मूर्खांचे दोन ठळक प्रकार समोर आलेत. एक अतिकाळजी करणारे आणि दुसरे म्हणजे निष्काळजी.

अतिकाळजी करणाऱ्यांमध्ये आमच्या ऑफिस मधला एक असामी होते. ह्या महाशयाने सुरुवातीच्या काळात हातावर सॅनिटाईझरच्या जागी एवढं disinfectant मारलं की त्याचा हात काळा पडला होता. त्याच्या सांगण्याप्रमाणे ह्याने एवढा टॉयलेट पेपर घेऊन ठेवलं होता की तेवढे पुढचे किमान 8 महिने संपूर्ण कुटुंबाला पुरतील.मला त्याला सांगायचं होत कि अरे बाबा कोरोना हा श्वसनसंस्थेवर आघात करणारा रोग आहे , पण तुमच्यासाठी कदाचित त्याने मोर्चा अजून खाली वळवला का? (त्यात मी पेपर मध्ये अस ही वाचलं होतं की व्युरझलन नावाच्या  एका ठिकाणी गाडीची काच  तोडून कोणी तरी टॉयलेट पेपर चोरले होते. त्या चोराने 'शूट आऊट एट वडाळा' चित्रपटातल मन्या सुर्वेच वाक्य फारच मनावर घेतल होत वाटत - ' गुन्हेगार तो कोई भी बन सकता है, ये तो यादगार बननेका  मौका है'). आमच्या ऑफिस मधील ही व्यक्ती असही सांगत होती की टिकणाऱ्या वस्तूंचा त्याने भरपूर साठा करून ठेवला आहे आणि त्याने त्याच संपूर्ण तळघर आता भरलं आहे. आमच्या कंपनीत होम ऑफिस बदल चर्चा चालू होती तर याच स्वतःच मतच बनत नव्हतं. बॉसला सांगत होता की आमच्या घरी ५ लोक आहेत, सगळे इंटरनेट वापरायला लागले तर काम कस होईल, आणि माझा लहान मुलगा विचारत असतो की पप्पा घरी आहे पण माझ्या सोबत खेळत का नाही, आमच्या प्रिंटरचे पेपर मागवावे लागतील वगैरे वगैरे. एवढं सगळं ऐकून बॉस फक्त ' अरे भाई आखीर केहना क्या चाहते हो' एवढं म्हणायचा बाकी राहिलं होता.

आता निष्काळजी प्रकारातल उदाहरण द्यायच तर माझ्या पासून एक हात भर लांब बसणाऱ्या एका जर्मन व्यक्तीच देता येईल. त्याची बायको चायनाची आहे. तो सासरच्या लोकांनी दिलेला रोग आपल्याला काही करणार नाही अशाच नादात होता. आम्हाला एकदम खात्रीने सांगायचा की हा रोग फक्त वयस्कर लोकांना होतो , आपण घाबरायचं काम नाही. (भाऊ स्वतः ५४ वर्षांचे आहेत, इकडची सवय असल्यामुळे मी त्याला नावाने हाक मारतो म्हणून तो बहुतेक स्वतःला तरुण समजायला लागला असावा. असोत).  त्यात भाऊंना स्किइंगचा लय नाद आहे. ह्या नादापायी ते फेब-मार्च मध्ये तिरोल ह्या गावी जाणार होते. (तिरोल आल्प्स पर्वत रांगांमध्ये स्कीइंग साठी फार प्रसिद्ध ठिकाण आहे) नेमका ह्या तिरोल मधूनच, पर्यटक स्थळ असल्यामुळे,  कोरोनाचा खूप प्रसार झाला होता. मी तस त्याला सांगितलं तर त्याच म्हणणं अस होत की "मी सुपरमार्केट मध्ये गेलो तरी मला कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहेच की! आणि जे तिरोल तू सांगतो आहे ते साऊथ तिरोल आहे, मी नॉर्थ तिरोलला जाणार आहे".माझ्या मनात त्याला विचारायचं आलं होतं की कधी स्कीइंग करताना एखादा अपघात झाला होता का की जिथे तुमच्या डोक्याला इजा झाली होती? अहो दादा, तो विषाणू ७००० किमी दूर तुमच्या सासरवरून इकडे आला आहे, तो काय ३५ किमी साऊथ वरून नॉर्थला नाही यायला काय थंडीत गुडघे भरून येणार आहे का त्याचे?  मी त्याला म्हणालो की दादा तुमचं सुपरमार्केटच लॉजिक बरोबर आहे  पण किती प्रमाणात ते तर बघा तर त्यावर त्याच उत्तर होत की बघू, आता जर मी मरणारच असेल तर एकदा शेवटचं स्किइंग करून मेलेलं बर आणि स्कीइंग करताना मी पूर्णपणे कपडे घातलेले असतात, म्हणजे टोपी, हातमोजे, जॅकेट, बूट असं सगळं असत. त्यामुळे तिकडे मला काही होणार नाही. मी मनात म्हणाल (आमचं मनातच चालायचं) तुम्ही तुमच्या घरच्यांचं ना ऐकणारे, माझं काय ऐकणार. जा आणि बसवा कोरोनाला आमच्या बोकांडी!

थोड्या बहुत प्रमाणात हे दोन्ही प्रकार जगभरात दिसले असतील. सुरुवातीच्या काळात जेव्हा कोरोनाबद्दल संपूर्ण माहिती नव्हती, व्हॉटस ऍप, फेसबुक इतरत्र जेव्हा खरी-खोटी वेगवेगळी माहिती येत होती तेव्हा हे असे प्रकार बघायला मिळाले. काही लोकांनी सोशल मीडियाने तयार केलेल्या आभासी भीतीचीच भीती घालून घेतली तर कोणी संकट नाहीच अशी समजूत करून घेत स्वतःच्या मनाचं समाधान करून घेतलं. चहाचा गॅस अचानक वाढवला की कशी चहापत्ती फसफसून वर येते तसे हे स्वभाव वर येतात, वातावरण निवळल की परत खाली जातात. पण हे दोन्ही प्रकार म्हणजे स्वतःला वाचवण्याचेच प्रकार असतात. अचानक आलेल्या नवीन संकटासमोर माणसाचा खरा स्वभाव समोर येतो, भीती नियंत्रण हातात घेते, माणुस सारासार विचार करत नाही आणि त्यातुन हे स्वभाव समोर येतात. लोकांनी फक्त स्वतःचा विचार करून Panic Buying करण किंवा बरेच तरुण मुलं-मुलीनी काही झाले नाही अशा प्रकारे बाहेर फिरण हा त्यातलाच प्रकार होता. हे सगळं बघून रामदास स्वामीजींच्या मूर्खांच्या लक्षणात कदाचित एक भर घालता येईल

"आभासी भयास भितो, संकटाचे अस्तित्व नाकारितो, तो येक मूर्ख"

पण हे सगळं असूनही कोरोना जर्मनीच्या आटोक्यात कसं आला? तर दूरवरचा आणि सारासार विचार करणार नेतृत्व आणि त्याला साथ देणार्या उत्कृष्ट पायाभूत सुविधा यांच्या जोरावर. जर्मन सरकारी यंत्रणेने सर्वतोपरी प्रयत्न केले, कोरोनाला शक्य तेवढं आटोक्यात ठेवलं आणि हळूहळू लोकांनी धोका समजावून घेऊन सरकारी यंत्रणेला साथ दिली. कोरोनाचा धोका अजूनही टळला नसला तरी आता यंत्रणा तयार झाली आहे आणि सर्वाना एक अनुभव आला आहे.  या सर्व प्रकरणातून हेच शिकायला मिळालं की संपूर्ण दुर्लक्ष न करता आणि अति बाऊही न करता शक्य तेवढ्या शांत विचाराने, संपूर्ण माहिती घेऊन कशाचाही सामना करावा.  आणि कस आहे, आपल्या हातात आहे शक्य तेव्हढ ते कराव कारण शेवटी

"देवाक काळजी रे, माझ्या देवाक काळजी रे...."

योगेश गवस,
ya.gawas@yahoo.in