कोरोना काळातील माझे अनुभव - संकेत कुलकर्णी (मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२०)
मी संकेत कुलकर्णी, सध्या फ्रँक फुर्ट ला फायनान्स शिकत आहे. जर्मनीशी माझी तोंड ओळख २०११ साली झाली, जेव्हा मी a२ परीक्षा देण्यासाठी उत्तर जर्मनी मधील एका गावात २१ दिवस राहिलो. पुढे सनदी लेखापाल(सी ए) पदवी मिळाल्यानंतर मी ऑगस्ट २०१९ मध्ये जर्मनी मध्ये आलो.
आमच्या कॉलेज ला जवळपास अख्खा जानेवारी महिना सुट्टी असते. तसेच माझी अर्ध वेळ नोकरी सुद्धा जानेवारी २७ पासून चालू होणार होती. म्हणून मी जानेवारी महिना, जवळपास अख्खा भारतात घालवला. तोपर्यंत कोरोना चीन मध्ये धुमाकूळ घालत होता. त्यामुळे जर्मनी मध्ये परत येताना जरा भीती होती. विमानतळावर फक्त चिनी प्रवाशांची तपासणी होते आहे, हे दिसल्यावर भीती जरा अजून वाढली. आमच्या कॉलेज ने आम्हाला तरीही सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा वेळेवर मिळतील अशी ग्वाही दिल्यामुळे भीती जरा कमी झाली. तरी फेब्रुवारी चा सुरुवातीला कोणी खोकले की मान लगेच वळायची आणि खोकणाऱ्या माणसाचा शोध घ्यायला लागायची. नोकरी च्या जागी सुद्धा आम्ही पूर्ण काळजी घेऊ, तसेच तुम्ही घरी राहून काम करू शकता असा पर्याय दिला होता.
मार्च महिन्यामध्ये कोरोना च्या समस्येने रौद्र रूप धारण केले. जर्मनी मध्ये जवळपास रोज १०००+ रूग्ण वाढणे चालू झाले. माझे आई बाबा चिंतित होते. परत येणे शक्य आहे का बाबा विचारायला लागले. त्यात आई कॅनडा मध्ये बहिणी कडे असल्यामुळे बाबांची चिंता अजून वाढली. मराठी पत्रकारांनी त्याकाळात इटलीच्या बातम्या जर्मनीच्या नावाने खपवणे चालू केले. मृतदेह उचलायला माणसं नाहीत, ही बातमी सुद्धा आली होती. आमच्या कॉलेज मधील एका विद्यार्थ्याला कोरोना झाला. त्यानंतर तो त्यातून बरा सुद्धा झाला. या सर्व गोष्टी ऐकून मग बाबांचा धीर सुटला. तेव्हा त्यांना इकडेचे मराठी मंडळ, तसेच भारतीय वकीलात भारतीय विद्ार्थ्यांना सर्व प्रकारे मदत करत आहे ते समजावले. या सर्वांच्या मध्ये अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे अशक्य झालं होते. पण परीक्षा जवळ आल्यामुळे पर्याय नव्हता. अशा वेळी मी पुल देशपांडे यांचे यूट्यूब वरील व्हिडिओ बघून आणि शिरीष कणेकर यांची पुस्तकं वाचून ताण कमी करायचा प्रयत्न केला. घरापासून ८००० किमी अंतरावर सुद्धा आपली मराठी माणसे आहेत आणि ती मदत करतील ही गोष्ट मनाला दिलासा देऊन गेली.
लॉकडाऊन् मध्ये अनेक मजेशीर गोष्टी घडल्या. अनेक जुने मित्र घरीच होते, त्यामुळे त्यांच्याशी व्हॉटसअप वर खूप वर्षांनी बोलता आले. अल्डी मध्ये टॉयलेट पेपर संपले होते. ३ ४ खेपा मारून सुद्धा ते मिळाले नाहीत. त्यावेळी माझ्या मित्राने भडकून ५० युरो चे टॉयलेट पेपर सरळ व्हिएन्ना मधून मागवले!
एप्रिल महिन्यापासून जर्मनी मध्ये कोरोना हळू हळू नियत्रणंध्ये यायला लागला होता. त्यामुळे अधून मधून बाहेर पडणे चालू केले. अल्डी मध्ये जाताना पूर्ण मास्क आणि हातमोजे, हे शिरस्त्राण घालूनच जायला लागलो. तोपर्यंत भारतामध्ये सुद्धा लॉकडाऊन् चालू झाला होता. मुंबईचा वेग इतका शांत होऊ शकतो आणि आपले शहर कोरोना च्या विळख्यात हळू हळू अडकत चालले आहे, हे दिसत असल्यामुळे डोळ्यात क्षणभर पाणी आले. सध्याची महाराष्ट्र राज्यातील परिस्थिती भीषण आहे. माझ्या कॉलेज मधील जे विद्यार्थी. भारतात परत गेले, ते आपला निर्णय चुकला अस मला बोलून दाखवत होते.
सध्या जर्मनी मध्ये लॉकडाऊन् बऱ्याच प्रमाणात उठवला गेला आहे. त्यामुळे आणि माझी सुट्टी चालू झाल्यामुळे, मी माझ्या मित्रांसोबत हायडेल्बर्ग ला जाऊन आलो. माईन नदीवर मात्र गेलेलो नाही. पण तेथील पर्यटकांचा ओघ आटला आहे. कोरोना च्या मुळे केस भयंकर वाढले होते. घरच्यांच्या प्रेमळ शिव्या खाऊन केस कापून आलो. एकंदरीत या सर्वातून आपण काही महिन्यांमध्ये बाहेर पडू अशी आशा आहे. मला जर्मनी मध्ये अजून फिरायच आहे!
संकेत कुलकर्णी,
Frankfurt,Germany
(sanket.kulkarni601@gmail.com)