ePrivacy and GPDR Cookie Consent Script by Cookie Consent

करोना, जर्मनी आणी मी - प्रणव फडणीस (मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२०)

करोना, जर्मनी आणी मी - प्रणव फडणीस (मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२०)

(सदर अनुभव हे मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२० साठी प्रणव फडणीसयांनी स्टुटगार्टशहरातून लिहिले आहेत)

माझे जर्मन जीवन सुरू होऊन लवकरच पाच वर्ष होतील. अनेक वर्षं (भारतात सुद्धा) जर्मन कंपनीत काम केल्यामुळे जर्मन इंजिनिअरींगल बद्दल खुप चांगला अनुभव घेता आला, आजही घेतोय. पण इथल्या वैद्यकीय व्यवस्थांबद्दल फारसा अनुभव घ्यायची वेळ आली नाही (सुदैवाने) आणी तशी इच्छाही नाही. तरी इथली व्यवस्था उत्तम आहे याविषयी शंका कधीच नव्हती.

करोनाची बातमी पहिल्यांदा पाहिली तेव्हा ते संकट जगभर पसरेल असं वाटलं नव्हतं. पण जश्या जश्या इटलीच्या बातम्या येऊ लागल्या तसं जर्मनीतही हा राक्षस येणार ह्याची भिती वाटु लागली. का कुणास ठाऊक पण करोना विषयी फारशी चर्चा मी ऑफिसमधे ऐकली नव्हती. इथलं सरकार आणी जनता एवढी निश्चिंत कशी हेच सुरूवातीला कळत नव्हतं. केसेस दिवसें दिवस वाढतायेत हे दिसत होतं. पण शेवटी सरकारनी पावले उचलली. कडक लॉकडाऊन जाहीर केला.

मग काय. होम हेच ऑफिस, ऑफिस हेच होम सुरू. लॅपटॉप बॅगेत भरला, कुलुप लावलं, तडक घरी. मुलीचं कीटा (किंडरगार्टन) बंद करण्यात आलं. सगळा परिवार घरीच! सुपर मार्केट मध्ये सगळ्या वस्तू राहतीलना ह्याची भिती होतं. टॉयलेट पेपरचा संपलेला साठा पाहून मी अवाक् झालो. फक्त जर्मनीत नाही तर जगभर ही अवस्था! असो. तरी जीवनावश्यक वस्तू कधी कमी पडणार नाहीत हे आश्वासन मिळाल्यावर सुपर मार्केट मधली गर्दी ओसरली. मग आठवड्यातून एकदा सुपर मार्केट मध्ये जायचे आणी जे हवय ते घेऊन यायचे असा आम्ही ठरवलं.

कुर्जअरबाईट म्हणजेच शॉर्टटाईम वर्क हा एक नविन प्रकार कळला. कोवीडमुळे किंवा कुठल्याही आपातपरिस्थितीत जर्मन कंपन्यांना आर्थिक फटका बसणार आहे हे ओळखून सरकार कंपन्यांना मदत करतं. म्हणजे अतिमहत्वाची कामं चालू ठेवायची आणी काही कर्मचार्यांचा कमी वेळ काम करून त्यांचा सत्तर ते ऐंशी टक्के पगार सुरक्षित ठेवायचा! म्हणजे काही कुटुंबात दोघंही पालक कार्यरत असतील, तर ते घरी असलेल्या मुलांसाठी वेळ देऊ शकतील आणी तसेच त्यांचे पगार चालू राहतील. आणी पगार चालू राहीला तर खरेदीपण चालू राहील. त्याने अर्थव्यवस्थेला मंदीतून काही प्रमाणात सावरता येईल. इतकेच काय कींडरगार्टनची फी सुद्धा काही प्रमाणात माफ केली गेली. जनतेला जे जे प्रश्न भेडसावतील त्यासाठी शक्यतितकी सगळी पावले सरकारने उचलली. वेळोवेळी राज्य सरकार व केंद्र सरकारचे प्रमुख जनतेला संबोधीत ही करत होते. पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे ही देत होते. आपल्या वैद्यकीय व्यवस्थेची परिस्थिती काय आहे आणी करोनामुळे त्यावर पडणारा ताण ह्याविषयी संपुर्ण आणी पारदर्शक माहिती ते देत होते.

हा झाला सरकारचा प्रयत्न. जर्मन लोक शिस्तबद्ध काम करतात हे सांगणं म्हणजे लता मंगेशकर चांगल्या गातात असं सांगण्यासारखं आहे. त्याचा प्रत्यय लगेच आलाच. घरी थांबायचे म्हणजे थांबायचेच. रस्त्यावर गर्दी करायची नाही म्हणजे नाहीच. सार्वजनिक ठिकाणी दीड मीटर अंतरावर थांबायचे. हस्तांदोलन किंवा गळाभेटी बंद. फुटपाथ वर चालत जाताना समोरून चालत येत असेल तर लगेच अंतर ठेवून पुढे जायचे किंवा शक्य असल्यास रस्ता क्रॉस करायचा. सोशल डिस्टंसींगचा पुरेपुर अनुभव आला. काही आगाऊ लोकं कुठे नसतात. पोलीसांची गस्तही चालु असल्याचं पाहण्यात आलं.

सरकार काय करतंय हा प्रश्न महत्त्वाचा आहेच. जनता काय करतेय हा पण तितकाच महत्त्वाचा भाग आहे. सरकार लाख उपाययोजना जाहीर करेल. इतक्या मोठ्या संकटाचा सामना करणं जनसहभागाशिवाय शक्य नाही. लाखाहून अधिक करोना पेशंट्सना बरे करणारे डॉक्टर्स आणी संपूर्ण वैद्यकीय व्यवस्थेचं कौतुक करण्यासाठी शब्द कमी पडतायेत. सलाम! त्याचबरोबर भारतीय दुतावासाशी सतत संपर्कात राहून जर्मनीत अडकलेल्या लोकांना मायदेशी परतायला मदत करणारे तसेच अडचणीत असलेल्यांना निस्वार्थ सहकार्य करणारी आपली मराठी मंडळं ह्यांचे योगदान ही नमुद करण्यासारखे. खरंच कौतुकास्पद. माणुसकी संकटकाळीच दिसते असं का म्हणतात ते कळलं.

करोनाच्या महामारीचा फटका सगळ्या जगाला बसला. तरी त्यातून सगळे बाहेर किती लवकर पडतील त्याप्रमाणेच कसे बाहेर पडतील हे भविष्यकाळच सांगेल. केसेस कितीही असोत एक किंवा एक लाख, बाहेर पडणे गरजेचे. सुरूवातीला केसेस जास्त होत्या, तेव्हा जर्मनीत चाललंय काय हा प्रश्न लोक विचारायचे. केसेस आटोक्यात आणल्यावर त्याचं कौतुकही होतय ह्याचा आनंद वाटतोय. कदाचित (देव न करो) परत एक लाट येईल ही, पण एकदा लढलो, परत लढूच ह्याचा विश्वास इथल्या सरकारवर, जनतेवर आणी माणुसकीवर आहे.

त्यामुळे गो करोना, वापस मत आना, अगर फिर आना, तो हम तैयार हैं ना!

---------------

प्रणव फडणीस
स्टुटगार्ट, जर्मनी
(pranavphadnis@gmail.com)

Show Comments