ePrivacy and GPDR Cookie Consent Script by Cookie Consent

एका गणपतीची गोष्टजर्मनीमध्ये उन्हाळ्याची खरी सुरुवात जुलै वगैरे मध्ये होते. मुलांच्या शाळांना सुट्ट्या लागतात, रस्ते रिकामे होतात, जर्मन सरकार विविध कामं काढायच्या नावाखाली सगळं शहर खोदून ठेवते, ऑफिसमध्ये कोणाला कामाचा मूड नसतो कारण अर्धं ऑफिस समर हॉलिडेवर असतं. आपणही एखाद्या समर ट्रिपची तयारी सुरू करतो. मग असंच एखाद्या जुलै महिन्याच्या रविवारच्या दुपारी आपण मस्त जेवून, परदे वगैरे ओढुन घेऊन, फॅन लावून लोळत एखादं पुस्तक वाचत पडलो असताना, अचानक अजितचा फोन येतो. आपल्याला कल्पना असते की फोन कशाबद्दल आहे, आपल्याला तो विषय आत्ता अगदी बोलायचा नसतो, डोळ्यांवर कुंभकर्णाला हेवा वाटायला लावणारी गुंगी आलेली असते. पण विषयाचं महत्त्व आपल्यालाही माहीत असतं. मग आपण स्वतःलाच शिव्या घालत कॉल घेतो. तिकडून आवाज येतो - "अरे गणपती एक महिन्यावर आलेत, आपला हॉल अजून बुक नाहीये. कॉल घ्यायला हवा.." वगैरे वगैरे वगैरे. आपण फोन ठेवतो. झोप उडालेली असतेच. मग आपण उट्ट काढायला बाकी टीमला फोन करतो आणि त्यांची पण झोप उडवतो. संध्याकाळी टीमचा कॉल होतो. गणपतीच्या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवल्या जाते .
आता या वर विषद केलेल्या भूमिकेत कधी मी असतो, कधी साकेत, कधी मुग्धा, तर कधी अजून कोणी. आता आम्ही आहोत, आधी अजून कोणीतरी असायचं. पण वर्षानुवर्ष सिच्युएशन साधारण अशीच असते. मग घाई घाईत पुढच्या आठवड्यात हॉलची visit ठरते. देशपांडे काका, अजित आणि टीममध्ये जमेल ती लोक हॉल बघून येतात. आपापल्या दिव्य जर्मन मध्ये आम्ही हॉलच्या हाऊसमाईस्टरला कार्यक्रम समजावून सांगतो. खुर्च्या कुठे हव्या, टेबल कुठे हवीत, जेवायची व्यवस्था कुठे करायची, साऊंड सिस्टीम कशी लावायची, माईक किती हवे वगैरे वगैरे आम्ही मागण्या टाकत जातो. तो त्याच्या जर्मन स्वभावाला जागून हे मला माहीत नाही, ते तुम्हाला ऑफिसला विचारावं लागेल, इथे आम्हाला पावर नाय, तिथे फायर एक्झीट असल्यामुळे तुम्ही कागदाचा चिटोरा सुद्धा ठेवू शकत नाही वगैरे वगैरे त्यांच्याकडची अस्त्र सोडत जातो. मग आमच्यातला त्यातल्या त्यात बरा जर्मन बोलणारा, त्याला थोडा मस्का लावत, थोडं हे हवंच आहे, ते नसलं तरी चालेल, अशी तडजोड करत, फायनल तोड पाणी करतो. तरीही कार्यक्रमाच्या दिवशी यातल्या अर्ध्या गोष्टी त्याने आपल्या मनाला येईल तश्या बदलल्या असतील याची आपल्याला खात्री असतेच पण तरीही त्याक्षणी काम झाल्याच्या आनंदात आम्ही असतो.
आपल्याला वाटेल की झालं संपलं. पण नाही ही तर सुरुवात असते. हळू हळू चढायला लागतो गणेशोत्सवाचा ज्वर. सांस्कृतिक कार्यक्रम कुठले करायचे. समान कुठून गोळा करायचं. कार्यक्रमाची मार्केटिंग कशी करायची. महाप्रसादाचे काय... कामांची लिस्ट बनायला सुरुवात होते.
दरवर्षी एखाद दुसरा वॉलेंटीयर गळून पडतो तर दोन चार नवीन कार्यकर्ते जॉईन होतात. यातून नेमक्या माणसाला हेरून त्याच्या स्वभावाला साजेसं काम देणं हे पण एक टास्क असतं.
दिवसाचे दोन तास रोज सतत नुसते कॉल्स. त्यात कधी चिडचिड, कधी रुसवे फुगवे. सगळं निभावून नेत पुढे जात जायचं.
गणपतीचा महाप्रसाद. याबद्दल तर एक वेगळा लेख लिहिता येईल एवढं मोठं काम असतं ते.
२०१५-१६ पासून आपण फ्रँकफर्टमध्ये कट्ट्याचा गणपती मोठ्या प्रमाणावर बसवायला सुरुवात केली. त्याला येणारे लोक हे वाढता वाढता वाढे या गुणोत्तराने दरवर्षी वाढत चालले आहेत. गणपती बसवताना इथे टीम कडून एक गोष्ट सुरुवातीपासून कटाक्षाने पाळली गेली की या कार्यक्रमाचा कमर्शियल इव्हेंट करायचा नाही. महाराष्ट्राला गणेशोत्सवाची मोठी सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा आहे. ती परंपरा या जर्मन मुलुखात आपल्याला जमेल तशी पुढे न्यायचा आपल्या परीने प्रयत्न करायचा. त्यामुळे सुरुवातीपासूनच गणपतीचा महाप्रसाद अर्थात जेवण हे कट्ट्याचे कार्यकर्ते स्वतःच बनवतात.
सुरुवात शंभर दीडशे लोकांसाठी महाप्रसाद बनवण्याने झाली ती आता साडे चारशे ते पाचशे लोकांसाठी हा महाप्रसाद तयार करण्यापर्यंत गेलेली आहे. या कामाची सुरुवात होते ती एवढ्या लोकांचा स्वयंपाक करायला जागा शोधण्यापासून. मग कधी मंदिर, तर कधी कट्ट्याच्या कार्यकर्त्याचे रेस्टॉरंट. त्या पुढचा टप्पा एवढ्या लोकांसाठी जेवण बनवायला लागणाऱ्या अजस्त्र भांड्यांची जुळवा जुळव. सगळ्या सामानाची लिस्ट, त्यानुसार खरेदी. दुसरीकडे रजिस्ट्रेशन वर सतत लक्ष. बजेट मध्ये बसतंय ना याची सतत काळजी. मग एखाद्या पदार्थासाठी स्पॉन्सर शोधणे. कामं संपायचं नाव घेत नाहीत . साइड बाय साईड स्वयंपाक करणाऱ्या कार्यकर्त्यांची टीम तयार करणे. मग हे कार्यकर्ते एक दिवस आधीच रात्री जमणार, रात्रभर कच्ची तयारी करून , दोन अडीच तास झोपून परत सकाळी चारला उठून स्वयंपाकाला तयार.
इथे हॉलवर हाऊस माईस्टरने नेहमीप्रमाणे माती खाऊन काहीतरी अरेंजमेंट बदललेली असते. त्याच्याशी जुळवून घेत, गोड बोलून चार पैकी दोन गोष्टी त्याच्याशी करवून घेण्यात आपण यशस्वी होतो.
कार्यक्रमाची सुरुवात होते. एक एक करून लोक यायला लागतात. गाणी, नाच, ढोल ताशे, लेझिम, गणपतीच्या नावाचा गजर. महिनाभर आपण ज्याच्या आगमनाच्या तयारीत असतो तो गणराय कट्ट्यावर प्रतिष्ठापित होतो. हे स्टेज वर सुरू असताना कट्ट्याचा कार्यकर्ता मात्र हजार प्रकारच्या आगी विझवण्यात बिझी असतो. एखाद्या परफॉर्मरच्या मनासारखी व्यवस्था नसते. तर कोणाला ऑन द स्पॉट दहा लोकांसाठी रजिस्टर करायचं असतं. कधी प्रसाद वेळेवर येण्यात विघ्न येतात. तर कधी स्टेजवर टेक्निकल प्रॉब्लेम. येणाऱ्या लोकांना यातल्या कुठल्याही प्रॉब्लेम्सची कल्पना येऊ नये याची काळजी घेत सतत हसतमुखाने इथून तिथे धावपळ करताना मग एका क्षणी आपल्या मनात विचार येतो, कशाला करायचे एवढे कष्ट. पुढच्या वर्षी आपण असंच बाकीच्या साडे चारशे लोकांसारखं रजिस्टर करून कार्यक्रमाला यायचं आणि एन्जॉय करायचं. कोणी सांगितलं ह्या लष्कराच्या भाकऱ्या भाजायला. मला वाटतं हे प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात दर कार्यक्रमाच्या वेळेस एकदा तरी येतंच येतं.
का करतो आपण हे? मी हा प्रश्न स्वतः ला बरेचदा विचारलाय. आणि मला त्याचं सापडलेलं उत्तर म्हणजे न करता स्वस्थ बसणं आपल्याला जमणार नाही म्हणून. As simple as that. आमचे देशपांडे काका आहेत. वय पंचाहत्तरीच्या पुढे. दरवर्षी कार्यक्रमानंतर आमच्यावर रागवतात, तुम्ही सगळे खूप गोंधळ घालता, मी यापुढे यात काडी मात्र लक्ष घालणार नाहीये. पुढच्या वर्षी तुम्ही तुमचं बघून घ्या. हे त्यांनी आम्हाला सांगायचं किमान पाचवं/सहावं वर्ष असेल. पुढच्या वर्षी काका परत त्याच जोमाने कॉल करून आम्हाला झापणार. "अरे काय करताय तुम्ही? अजून कार्यक्रमाचा हॉल पण बुक नाही केलाय."
आमच्यातला कार्यकर्ता शांत बसत नाही, बसू शकत नाही.
शेवटी, भगवंत, त्याची पूजा, त्याला जोडून येणारी भाविकांची श्रद्धा तर आहेच, पण त्याचबरोबर आहे ती आपण भारतीयांची उत्सवप्रियता.
पु. ल. म्हणतात "शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी … वांग्याचे भरीत …गणपती बाप्पा मोरया ची मुक्त आरोळी.
केळीच्या पानातली भाताची मूद आणि त्यावरचे वरण.…
मारुतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातले उडालेले पाणी…दुस-याचा पाय चुकून
लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार… दिव्या दिव्या दिपत्कार…"
गणेशोत्सव तरी वेगळं काय आहे हो.
कार्यक्रम संपल्यावर एखादा/एखादी स्टूडेंट येतो आणि आवर्जून सांगतो की कट्ट्याच्या गणेशोत्सवामुळे घरच्या गणपती / गौरींची आठवण येऊन होमसिक वाटलं नाही. आपल्याला आपले विद्यार्थीदशेतले दिवस आठवतात आणि वाटतं याच साठी केला होता अट्टाहास.
कार्यक्रम संपून, सगळं आवरून, हॉल साफ करून, लोकांना आणि सामानाला त्यांच्या घरी सोडून, घरी पोचायला रात्र होते. बहुतेक वेळा गणेशोत्सवाचा कार्यक्रम वीकेंड बघून, शनिवार रविवारी असतो. तो शनिवारी असला की आपण मनाशी आराखडे बांधतो, चला आता या रविवारी तरी आपण अगदी मनसोक्त लोळत आपल्या आवडीचे पुस्तक वाचत/सिरीज,सिनेमा बघत श्रमपरिहार करणार. या प्लॅननुसार रविवारी जेवून बिवून, मस्त बडीशेप तोंडात टाकून, सगळे परदे बिर्दे ओढुन घेऊन अंधार करत जसं आपण आपलं आवडतं पुस्तक हातात घेतो, आपला फोन वाजतो आणि पलीकडून आवाज येतो - "अरे दिवाळी दोन महिन्यांवर आली आहे. आपण अजून हॉल बुक केलेला नाहीये. कसं होणार. लोकांना हलवलं पाहिजे... "
.
.
.
इंद्रनील पोळ
मराठी कट्टा कार्यकर्ता

Show Comments