ePrivacy and GPDR Cookie Consent Script by Cookie Consent

जर्मनीतील लॉकडाऊनचे अनुभव - अमृता पेडणेकर (मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२०)

जर्मनीतील लॉकडाऊनचे अनुभव - अमृता पेडणेकर (मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२०)

जर्मनीतील लॉकडाऊन असं काहीसं नाव द्यावं वाटलं होतं या लेखासाठी. पण म्हटलं नको .... जर्मनी आणि लॉकडाऊन हे खरंतर विरूद्ध अर्थी शब्द वाटतात.

जर्मनी म्हटल्यावर स्वातंत्र्य, मोकळेपणा , निवांतपणा, निरभ्र आकाश , हिरवाई हेचं डोक्यात येत ना हो पहिले ... पण या जगात कुणालाही देशाला न सोडणारे कोरोनाचं वादळ इथेही येऊन थडकलच... त्यात आमचा जिल्हा  Bavaria जास्त बधित ... त्यामुळे पाहिला मान आम्हाला . लॉकडाऊनच्या बातमीने साता समुद्रापार राहणाऱ्या माझ्या आईची काळजी मात्र वाढवली. सेवा निवृत्तीला पोहोचलेल्या बाबांच्या डोळ्यात नातवंडांचे चेहरे तरळू लागले. कशाला जाऊन राहता इतक्या लांब? हा डोळ्यातून न लपणारा प्रश्न जमेल तितका लपवू पाहत होते दोघेही.

असो ... पण खूप काही शिकवलं बरं या कोरोनाने . त्याची यादीच करायची ठरवली तर पहिला नंबर लागतो माझ्या कॅनव्हास पेंटिंगचा. आयुष्यात कधीही हातात रंग घेईन असं वाटलं नव्हतं मला . चित्रकला हा माझा प्रांत नाही हे अगदी अगतिकपणे मान्यच केलं होत जणू मी.  पण आज माझ्या घराच्या भिंती मी बनवलेल्या चित्रांनी सजल्या आहेत .... अनपेक्षित आनंद तो आणखी काय असावा ? कुठल्याही मॉल मधून खरेदी केलेल्या सजावटीला तुमच्या हौसेच मोल नाही. माझ्या चित्रकलेच्या सरांनी जर आज हे सगळं पाहिलं तर पहिला धपाटा घालतील पाठीत. " हे सगळं शाळेत काढायला काय झालं होतं तुला ?" असं म्हणत

जर्मनीने  विद्यार्थ्यांना घरी राहण्याची मुभा दिल्यामुळे माझी दोन्ही शाळकरी मुले घरी ... याचीच तर वाट पाहत होते मी कित्ती दिवस . मराठी संस्कार करण्याची हीचं खरी वेळ . चालून आलेली संधी वाया घालवले ती आई कसली ? त्यांना सूर्य नमस्कार शिकवले , गणपती स्तोत्र पठण करून घेतलं .चित्रकलेचे धडे, गणिताचा सराव, वक्तृत्व कला , बुद्धिबळ कौशल्य आणि बरंच काही … अस्खलित जर्मन भाषेत बोलणारी मराठमोळी मुलं संस्कृत ही तितक्याच लीलया पेलताना पाहून हेवा वाटतो या पिढीचा. गगनाला भिडणार सुख म्हणजे ... मुलं मराठी लिहायला शिकली.

Bleiben zu Hause मुळे यजमान ही घरी . तुम्ही मला हल्ली वेळच नाही देत या समस्त बायको जातीवर या कोरोना ने काढलेला उपाय म्हणा हवं तर.  मग रोज नवीन पदार्थ . माझ्या रेसिपी च्या  YouTube channel साठी भरपूर रुचकर व्हिडिओ मिळाले. खादाडाच्या पंगतीतील आमचं कुटुंब अजुन धष्टपुष्ट होणार असं वाटतंय 😀 भाज्या आणि इतर सामानाच्या खरेदी साठीही बाहेर जाणं टाळत होतो आम्ही ... मग घराच्या गच्चीत उगवली कोवळी लुसलशीत कोथिंबीर आणि हिरवी गार मेथी... घरचा भाजीपाला ... आपलं काही तटत नाही ... अस्सल कोल्हापुरी बाणा 😎

शाळेत असताना गुरुजी शिकवायचे तेव्हा कधीही मन लावून प्राणायाम शिकले नाही. पण आता जीवाच्या भीतीने सकाळी न चुकता प्राणायाम करते. तुमच्या पासून काय लपवायचे. आज सगळच मान्य करायचं ठरवलं.

कित्तीतरी दिवसांची अपूर्ण इच्छा... महाभारत पाहणे... ती ही पुर्ण करून घेतली . आता जर्मनी मध्ये राहणाऱ्या माझ्या मुलांनाही भीष्म पितामह कोण ? कर्णानेही पांडव बंधुंशी का युद्ध केलं ? ह्या सर्वांची उत्तर माहीत आहेत. आपली नाळ आपल्या मातीशी जोडलेली असते आणि त्याचं प्रेम कधीही कमी होत नाही हे पुन्हा एकदा सिध्द झाले.

"आपला भारत देश खरंच खूप छान आहे ग आई " हे वाक्य जेव्हा ८ वर्षाच्या मुलाच्या तोंडून ऐकलं तेव्हा वाटलं कोरोना अशा मागे पडलेल्या दिव्यांची आठवण करून देण्यासाठी तरी नसेल आला ? मोदी आजोबांचं भाषण न चुकता ऐकलं पिल्लानी. आपल्या मदत करणाऱ्या भारतीय योध्यांसाठी गच्चीत उभे राहून इथूनच टाळ्या वाजवल्या, दिवे लावले. याचा एक व्हिडिओ ही मी ट्विटर ला पोस्ट केला होता. कोल्हापूर मध्ये राहणाऱ्या माझ्या वडिलांचा उर अभिमानाने भरून आला हे पाहताना.

मला सांगा ... सुख म्हणजे अजुन नक्की काय ? हेचं ... आजोबांना नातवाचा अभिमान वाटावा. हे वर्तुळ पुर्ण करण्यात मी यशस्वी झाले .आणि मला मदत केली या Corona  लॉकडाऊनने. Corona च्या भीतीने किंवा काळजीपोटी म्हणा ... नातेवाईक, मित्र परिवार सर्वांना फोन करून झाले ... नात्यातील लांबत जाणार अंतर या लॉकडाऊन मुळे नक्कीच कमी झालं . आपण एकमेकांच्या अजुन जवळ आलो .

घरी बंदिस्त असण्याच्या काळात एक सुंदर विरंगुळा म्हणजे आमचे शेजारी . दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास न चुकता तो मुलगा रोज खूप छान बासरी वाजवायचा. आम्ही सगळे गच्चीत बसून मंत्रमुग्ध होऊन ऐकायचो. त्याची बासरी वाजवून झाली की सगळे आपापल्या घरातून टाळ्या वाजवत असू. आभार प्रदर्शनाचा हा एकच पर्याय समोर दिसत होता तेव्हा. जितका होता होईल तितका साकारार्थी राहण्याचा चाललेला एक निष्फळ प्रयत्न म्हणा हवं तर आपला. पण अशाच छोट्या छोट्या गोष्टी बळ देत राहिल्या.

लॉकडाऊन थोडं शिथिल झाल्यावर थोडे पाय मोकळे करावे म्हणून बाहेर पडलो आम्ही सगळे. इतके दिवस सगळे घरी बंधिस्त होते . नियम हे फक्त काटेकोर पाळण्यासाठीच असतात हे जर्मन लोकांकडून नक्की शिकावं असं. त्या दिवशी  रस्त्यात एक ओळखीचे जर्मन कुटुंब भेटले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता भारतीय पद्धतीने हात जोडून नमस्कार केला आम्हाला. दोघांत ठराविक अंतर पाळण्यासाठी , corona ला हरवण्यासाठी जे जग आत्ता शिकते आहे , ते आपण सर्वांना जन्मापासून देणगी म्हणून मिळालं आहे. जर्मनी मधे वास्तव्यास असताना भारतीय असल्याचा आज पुन्हा एकदा अभिमान वाटला.

बाहेरून फिरून आल्यावर माझी आजी पायावर पाणी घेतल्याशिवाय घरी घेत न्हवती आम्हाला. आज सगळं जग ओरडून सांगत आहे …बाबांनो, या सवयी लावून घ्या. पहा, खरंच प्रगत आहोत आपण.

Corona च वादळ काय आज ना उद्या जाणारच .... पण जाता जाता खूप गोष्टी शिकवत आहे.  उन्हाळा सुरू झाला की सहली करणारे जर्मन रहिवासी घरी थांबले आहेत या वर्षी ... या वादळाने आपल्याला गरज आणि चैनी यातील रेषा ठळक करून दिली. कुटुंबासाठी दिलेला वेळ कितीतरी पटीने आनंद उत्पन्न करतो , हे आपण विसरलेले सत्य ओंजळीत परत आणून ठेवलं .

आता आपलं कर्तव्य हेचं... या ओंजळी मधील आनंदाला पुन्हा सुटून देणे. हा आनंद जमेल तितका ओंजळीत भरून घ्या. ठणका मारणारी जखम भरून आली की उठलेल्या व्रणचा अभिमान वाटतो कधी कधी. Corona ही अशीच जखम आहे.  आपण यातून सहीसलामत बाहेर पडलो .. कसे याचे किस्से पुढच्यापिढीला आपण अभिमानाने सांगू हे मात्र नक्की.

अमृता पेडणेकर
(amruta.jadhav1@gmail.com)

Show Comments