ePrivacy and GPDR Cookie Consent Script by Cookie Consent

लॉकडाउन जर्मनीतलं - गौरी पंडित-पुजारी (मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२०)

लॉकडाउन जर्मनीतलं - गौरी पंडित-पुजारी (मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२०)

(सदर अनुभव हे मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२० साठी गौरी पंडित-पुजारी यांनी म्युनिक शहरातून लिहिले आहेत.)

गेली तीन वर्षं आम्ही म्हणजे माझा नवरा  पुष्कराज,आमचा सहा वर्षांचा मुलगा विहान आणि मी जर्मनीतल्या म्युनिक या शहरात राहतोय.

कोरो़नाचा राक्षस दिवसेंदिवस हातपाय पसरू लागला आणि इथे जर्मनीतही मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात लॉकडाउनची घोषणा झाली.आम्ही तिघेही आता काही दिवस २४ तास एकमेकांबरोबर घरात या कल्पनेने थोडं बरं वाटलं तर एकीकडे थोडं नकोसंही वाटलं.

पुष्करला ऑफिसमधून घरुन काम करण्याची परवानगी मिळाली होती त्यामुळे दिवसभर तो कामातच असणार होता.आमच्या सहा वर्षांच्या विहानला वेगवेगळ्या खेळात/कामात गुंतवण्याचं मात्र मोठं आव्हान होतं.

पहिले चार पाच दिवस मजेत गेले.उशीरा उठणं, हळूहळू कामं आवरणं,रात्री पिक्चर बघत जागरण करणं,मध्यरात्री कोल्ड कॉफी करुन पिणं असा मस्त सुट्टीचा माहौल होता.नंतर मग भारतातही लॉकडाउन जाहीर झालं, जगभरात वाढलेल्या संसर्गाच्या बातम्या येऊ लागल्या आणि खूप काळजी वाटू लागली.पूर्ण उत्साह नाहीसा झाला,हताश वाटू लागलं.निराशेचे काळे ढग पूर्ण घरावर पसरू लागले.

यातून बाहेर आलं पाहिजे हे कळत होतं पण वळत नव्हतं.मग एकदा सहजच पुष्करने पु्.लं चं कथाकथन लावलं आणि क्षणार्धात मूड बदलला.सगळं मळभ दूर झालं आणि पुन्हा घर हसू,खेळू लागलं.

मग दररोजची एक शिस्त आखून घेतली. व्हॅक्युम क्लीनरने घर स्वच्छ करणं आणि मशीनमधले धुतलेले कपडे वाळत घालणं ही कामं पुष्करने स्वत:कडे घेतली. स्वयंपाकाचं मुख्य काम आणि बाकी छोटी मोठी अनेक कामं अर्थात माझ्याकडे.

दररोज दोन वेळा जेवण आणि दोन वेळा चहा असा जरा सोईस्कर दिक्षीत डाएट पॅटर्न आम्ही दोघांनी सुरू केला.(विहानचा मात्र रिकाम्या वेळामुळे दिवेकर पॅटर्न सुरू होता.)घरी जमेल तसा व्यायाम सुरू केला.इथे बाहेर फिरण्यावर बंधन नसल्यामुळे  कधी कधी छान बाहेर फिरायला जाऊ लागलो.रोज संध्याकाळी दिवा लावला की मिळून रामरक्षा म्हणायला सुरुवात केली.

अशा रुटीनमुळे मला स्वत:साठीचा वेळ मिळत होता.फेसबुकवर लिहीता येत होतं.गंमत म्हणजे या कालावधीत मला बरचसं विनोदी सुचत होतं आणि जे सुचत होतं ते मी लिहीत होते. काही ऑनलाईन लेखन स्पर्धेत भाग घेतला.काही लोकांचे ब्लॉग नियमित वाचले.यूट्यूबवर मुलाखती, गाणी यांचा आस्वाद घेतला. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून बरेच लोक कथा, कवितांचं अभिवाचन करत होते त्याचा आनंद घेतला.लहानपणी थोडंसं कथ्थक शिकले होते तेसुद्धा लाइव्ह सेशनमधून पुन्हा शिकायला मिळालं.घरी पुस्तकं असल्यामुळे वाचन तर सुरुच होतं.इतक्या सगळ्या उपक्रमांतून कधी कधी वेळ पुरत नव्हता खरं तर! त्यामुळे घरी बसून बोअर मात्र वाटलं नाही.

इथे लॉकडाउन असलं तरी पब्लीक ट्रान्सपोर्ट चालू होता.शक्य असेल तितक्या लोकांना घरातून काम करण्याची सोय होती पण बाकी लोकांना ऑफिसला जावं लागत होतं.

रेस्टॉरंट चालू होती पण तिथे जाऊन खाण्याची परवानगी नव्हती. टेक अवे आणि डिलीव्हरी चालू होती. शॉपिंग मॉल, चित्रपटगृह,शाळा सगळं बंद होतं. सोसायटीच्या आवारात असणारे झोका, घसरगुंडी वगैरे पट्ट्या लावून बंद केलं होतं. असं असलं तरी आपापल्या कुटुंबासोबत बाहेर फिरणं, व्यायाम करणं याला परवानगी होती. इथे एरवीही कोणी एकमेकांच्या घरी बोलवल्याशिवाय जात नाही.या परिस्थितीत तर अजिबातच कोणी कोणाकडे जात नव्हतं.

एप्रिलमध्ये इस्टरच्या रविवारी मात्र अचानक सकाळी आमच्या घराची बेल वाजली.दार उघडलं तर माझी जर्मन शेजारीण हातात चॉकलेट्सची परडी घेऊन उभी होती. ती परडी डायरेक्ट हातात न देता तिने खाली ठेवली आणि तुझ्या मुलासाठी आहे हे…. असं म्हणत हात जोडून नमस्ते करून पटकन निघून गेली. तिला भारतीय खाणं आवडतं म्हणून याआधी दिवाळीत मी तिला आपला फराळ दिला होता.लॉकडाउनमधल्या तिच्या सणाच्या वेळी तिनं आवर्जून माझी आठवण ठेवली याचं मला अप्रूप वाटलं.

सार्वजनिक ठिकाणी जाणं जितकं कमी करता येईल तितकं करण्याचं ठरवलं होतं.त्याप्रमाणे आठवड्यातून एकदाच सुपर मार्केटमध्ये जाऊन फळं,भाज्या, दूध,बाकी सामान आणून ठेवायला सुरुवात केली. तसंच जर काही दिवसांनी सामानाची वाहतूक कमी किंवा बंद झाली तर हा विचार करून इंडियन ग्रोसरीचा कमीत कमी वापर करून स्वयंपाक करण्याचं स्वत:च स्वत:ला चॅलेंज दिलं.

त्यामुळे जेवणात सूप,कटलेट,भाताचे प्रकार, ब्रेडचे वेगवेगळे प्रकार केले. प्रतिकारशक्ती वाढवणं सुद्धा महत्त्वाचं होतं म्हणून आहारात भाज्या,फळं, दूध, पनीर यांचा वापर जास्तीत जास्त केला. सुदैवाने अजूनपर्यंत तरी कोणत्याही गोष्टीची टंचाई जाणवली नाही की वस्तूंच्या किमतीत वाढ झाली नाही. इंडियन ग्रोसरीसुद्धा घरपोच मिळत होती,मिळते आहे.

चांगलं खाणं असलं की मूड सुद्धा चांगला राहतो त्यामुळे स्वयंपाकघरात वेगवेगळ्या रेसिपी केल्या.(तसंही दोनदाच जेवत होतो ना... त्यामुळे जेवण चांगलं पाहिजेच!) पावभाजीचा पाव,पाणीपुरीच्या पु-या,मिल्कमेडपासून खरवस आणि हिरव्या मिरचीचे देठ वापरून विरजणाचं कल्चर करून छान दही लावणं असे काही यशस्वी प्रयोग केले.या गोष्टी घरात सगळ्यांना इतक्या आवडल्या की आता इथून पुढे आम्हाला हे सगळं घरचच पाहिजे असं सगळ्यांचं मत बनलं.(माझंच काम मी वाढवलं😄)


विहानच्या बाबतीत सांगायचं तर त्याची सर्जनशीलता आणखी वाढली.(जर्मन किंडरगार्टनमध्ये जात असल्यामुळे अभ्यास करण्याचा प्रश्न नव्हता, त्यामुळे सुट्टीतला होमवर्क नाही की कुठला प्रोजेक्ट नाही!) त्याने घरातल्या पडून असणा-या,न लागणा-या वस्तूंपासून स्वत:च स्वत:चे खेळ तयार केले.

आम्हीसुद्धा त्याच्याशी कार्ड गेम खेळणं,त्याच्या खेळातल्या अॅक्टमधे सामील होणं, रोज त्याला आलटून पालटून मराठी, इंग्लिश आणि जर्मन भाषेतली गोष्ट वाचून दाखवणं,त्याला बरोबर घेऊन केक, कुकीज बनवणं मनापासून एन्जॉय केलं.

बाकी नेटफ्लिक्सवरचे पिक्चर,मित्रमैत्रिणींशी, नातेवाईकांशी फोनवर गप्पा, व्हॉट्स ॲपवरची कोडी हे विरंगुळेसुद्धा मूड हलका ठेवत होते. पूर्णवेळ एकमेकांबरोबर घरात राहून एकमेकांवर चिडण्याचे,रागावण्याचे,क्वचित उगाच रडू येण्याचे मूड स्विंगस् अचानक  होत होते पण पटकन दुसऱ्या गोष्टीत गुंतवून घेऊन नॉर्मल होण्याचं तंत्रही जमू लागलं होतं. भारतातले नातेवाईक,युरोपातले प्रवास, मैत्रिणीबरोबरची कॉफी, उगाचच भटकत केलेलं विंडो शॉपिंग या सगळ्यांची खूप आठवण येत होती; कधी कधी रात्री झोपच येत नव्हती;मित्रांबरोबर पुन्हा कधी खेळायला मिळेल याची मुलगा वाट बघत होता.

नंतर चार मेपासून इथलं लॉकडाउन टप्प्याटप्प्याने संपलं. हळूहळू रुटीन सुरू झालं तरी बाहेरचं हे संकट कधी संपणार; पूर्वीचं साधं,सोपं आयुष्य कधी पूर्ववत होणार याची कोणालाच कल्पना नाही पण आपला आनंद आपणच शोधणं, आशावादी राहणं हे तर आपल्या हातात आहे. त्यामुळे बाहेरच्या कोणत्याही नकारात्मक गोष्टींचा विचार करून आपल्यावर परिणाम करुन घ्यायचा नाही, योग्य ती काळजी घ्यायची आणि चांगल्या गोष्टींची मनापासून इच्छा/प्रार्थना करायची असं आमच्या घरी तरी ठरलंय!

गौरी पंडित-पुजारी
म्युनिक,जर्मनी

Show Comments