ePrivacy and GPDR Cookie Consent Script by Cookie Consent

जर्मनीतील लॉकडाऊनचे अनुभव - - इच्छा अभिजीत कदम (मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२०)

जर्मनीतील लॉकडाऊनचे अनुभव - -	इच्छा अभिजीत कदम (मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२०)

मी आज जर्मनी मध्ये राहते. पुण्यातल्या सोफ्टवेअर कंपनी मधला जॉब सोडून जर्मनी ला स्थायीक झाले ह्याचं एकमेव गोड कारण म्हणजे “लग्न”. माझा नवरा एका जर्मन IT कंपनी मध्ये नोकरी करतो आणि लग्न झालं की मी ही त्याच्या सोबत शिफ्ट झाले.

आज जगभर पसरत चाललेल्या “कोरोना” (Covid-19) ह्या विषाणूने सुरळीत चालणाऱ्या जीवनाला स्थगिती दिली आहे. आपण बातम्यांमध्ये बघत असालच की जर्मनीत देखील स्थिती किती भयावह होत चालली आहे. आज जर्मनी मध्ये रुग्णांची संख्या दीड लाखाहून हून अधिक आहे.

जर्मन सरकारने सुद्धा “लॉकडाऊन” जाहीर करून रुग्ण संख्या नियंत्रीत केली आहे. फक्त आवश्यक लागणाऱ्या वस्तुंसाठी घरातील एक व दोनच सदस्य एका वेळी बाहेर पडू शकतात असा आदेश दिलेला आहे. जर तुम्हाला कोरोनाची चाचणी करायची असेल तर तुम्ही सरकारी वेबसाईट वर दिलेल्या फोन क्रमांकावर संपर्क साधून थेट डॉक्टरांशी संवाद साधू शकतात व ते तुम्हाला सहकार्य करतील.

बाकीच्या देशांपेक्षा जर्मनीतील मृत संख्या बरीच नियंत्रणात आहे. ह्याचं कारण असं की, चाचणी करण्याचं प्रमाण ही तितकंच जास्त आहे. सध्या ह्या विषाणूवर मात करण्यासाठी कुठलंच औषध उपलब्ध नसल्यामुळे जर्मन सरकारने कर्फ्यु जाहीर करून लोकांना घरामध्येच बसण्याच आव्हान केलं आहे. बऱ्याच कंपन्यांनी देखील कर्मचाऱ्यांना “वर्क फ्रॉम होम” म्हणजेच घरी राहून काम करण्यास सांगितले आहे.

शाळा कॉलेजेसना सुद्धा सुट्टी असल्या कारणाने मुले ही घरीच आहेत. काही शाळा आणि कॉलेजेस “वर्चुअल क्लासेस” म्हणजेच ऑनलाईन वर्ग घेत आहेत. अत्यावश्यक समान लागणारी दुकानं जसं की- Rewe, Lidl, Netto, Edeka ही ठरावीक वेळेला सुरू असतात ज्यामध्ये आपण दररोज लागणाऱ्या वस्तू आणू शकतो.

जर्मनीच्या आजू बाजूच्या देशांमध्ये भरपूर प्रमाण वाढत आहे त्यामुळे जर्मन सरकारने परिस्थिती चा अंदाज घेत लवकर निर्णय घेऊन सगळ्या सीमारेषा बंद केल्या आहेत. शहराच्या प्रत्येक भागात सरकारतर्फे जंतुनाशक फावरण्यात येत आहे. लोक एकदाच सामान खरेदी करत असल्यामुळे बऱ्याच दुकानांमध्ये टॉयलेट पेपर्स आणि दैनंदिन वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे घरपोच सेवा दुकानंतर्फे देण्यात येत आहे ज्यात अधिक वस्तूंची खरेदी तुम्हाला करता येत नाही जेणेकरून सर्वांना वस्तू उपलब्ध व्हाव्यात.

सगळे आता १०-१५ दिवसांपासून घरातच राहिल्यामुळे थोडा कंटाळा येत आहे परंतु जर कोरोना वर मात करायची असेल, तर घरी बसने हाच एक उपाय आहे.

आम्ही विरंगुळा म्हणून युट्यूब वर नव नवीन पदार्थ शिकतो, वेग वेगवेगळे सिनेमा पाहतो, बरेच ऑनलाईन कोर्सेस शिकतो. लॉकडाऊन काळात मी, माझे सर्व छंद स्वैरपणे जोपासले, मग ते गायन असो, फोटोग्राफी असो अथवा पाककृती असो. थोडक्यात काय? तर वेळेचा सदुपयोग हा अतिशय चांगल्याप्रकारे केला आहे. असे एक ना अनेक गोष्टी तुम्ही देखील करू शकता. डिजिटायझेशन च्या ह्या काळात बरेच पर्याय उपलब्ध आहेत. त्याचा पुरेपूर वापर करा कारण हीच एक संधी आहे. उलट ह्या कोरोना मुळे आपण घरच्यांच्या जवळ राहून नवीन गोष्टी शिकू शकतो आणि स्वतःसाठी वेळ काढू शकत आहोत. ह्या वेळेचा लाभ घेऊया आणि कोरोना-मुक्त जग लवकरच पाहायला मिळेल अशी आशा करूया.

मी सर्वांना नम्र विनंती करते, कृपया घरातच बसा आणि सरकारला सहकार्य करून कोरोना नष्ट करून दाखवूया.


इच्छा अभिजीत कदम
(ichchha.deshmukh35@gmail.com)

Show Comments