ePrivacy and GPDR Cookie Consent Script by Cookie Consent

मराठी कट्टा निबंध स्पर्धा - जर्म'मनी'च्या गुजगोष्टी

मराठी कट्टा निबंध स्पर्धा - जर्म'मनी'च्या गुजगोष्टी

These letters were written by Abhijit Shrotri for Marathi Katta Blog Spardha 2018, that was held on Marathi Katta Germany's 5th Anniversary.

बर्याच दिवसानंतर पत्र लिहित  आहे (१०  वि नंतर प्रथमच )त्यामुळे कशी सुरुवात करावी हा फार मोठा प्रश्न आहे तरी लिहायला बसलो आहे. विचार करता करता आपोआप सुटेल बहुतेक हा प्रश्न. तर  लिहिण्यास कारण कि आपण अधून मधून समक्ष किंवा अप्रत्यक्षपणे फोन वर बोलत असतोच पण या आधुनिक युगात सुद्धा पत्रातील मजकूर काळजाला हात घालतो. म्हणूनच ठरवून ह्या पत्र प्रपंचाने क्षेमकुशल कळवावे असे निश्चित केले आहे.

नवीन देशात पाउल ठेवताक्षणी बरेच मूलभूत फरक पाहायला मिळाले. त्यातील काही अनुभव येथे लिहिण्याचा प्रयत्न करतो. इकडचे लोक खूप वक्तशीर आहेत. भाषेला प्रचंड मान देतात आपण त्यांची भाषा बोलण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना खूप आनंद होतो. पण आपल्याकडून बोलताना व्याकरणाच्या काही चुका झाल्या तर ते लगेच इंग्रजी बोलायला सुरुवात करतात. येथे आल्यानंतर व लं द लोकांशी बोलण्याचा प्रसंग तसा फार कमी वेळा आला पण बोलण्यातून हे लोक अतिशय प्रेमळ आणि कनवाळू वाटतात. पण खरे सांगायचे तर भारतीय लोकां इतकी प्रेमळता जगात कुठेच नसावी.
शिस्त येथील लोकांच्या नसानसात भिनलेली आहे. एक अनुभव सांगतो. आम्ही प्राणीसंग्रहालय पाहण्यास गेलो असता तेथे एक मुलगा मत्स्यालयाच्या काचेला हात लावत होता हे गोष्ट त्याच्या आईच्या लक्षात येताच तिने त्याला अतिशय गोड भाषेत समजावून सांगितले. त्या मुलाने पुढील पूर्ण वेळ काचेला हात लावल्याचे माझ्या पाहण्यात आले नाही. हीच शिस्त वेळेच्या बाबतीतही तंतोतंत जुळते. येथे सर्व कामे वेळेत होतात. इकडचे साहेब कधी चहा प्यायला जात नाहीत कार्यालयात उशिरा पण येत नाहीत. प्रत्येकाच्या कार्यालयात सर्व वस्तू जागच्या जागी ठेवलेल्या सर्व लागणाऱ्या वस्तूंसाठी योग्य पद्धतीने खास जागा केलेली. काही इमारती या खरच स्थापत्याचा उत्तम नमुना आहेत. काही इमारती या आधुनिक आणि प्राचीन स्था प  त्य शास्त्राचा संगम च. जवळपास सर्वच इमारती उतरत्या छपराच्या. सर्व इमारतींच्या बाहेर एका कोपर्यात कचरा साठवण्याचे मोठे मोठे डबे आणि कचरा गोळा करणारे विशिष्ट प्रकारचे वाहन ज्यामध्ये कचरा गोळा करण्यासाठी कोणालाही बसावे लागत नाही सगळे काही यांत्रिक.
रस्त्यांना ३ लेन आहेत ज्या गाडीला पुढील चौकात वळायचे आहे त्या गाडीने मधली लेन वापरावी बाकीच्यांनी उरलेल्या दोन येण्यासाठी आणि जाण्यासाठी चौथी लेन खास बस साठी त्याशेजारी प्रशस्त फुटपाथ आणि सायकल साठी वेगळा रस्ता. विशेष म्हणजे फुटपाथ वर अतिक्रमणे नाहीत. लोक सिग्नल चे तंतोतंत पालन करतात त्यामुळे ते सर्वांनीच करावे अशी त्यांची माफक अपेक्षा असते. एखादी व्यक्ती झेब्रा क्रोस्सिंग वरून रस्ता ओलांडत असेल तर इकडचे लोक त्याच्या १ मीटर अलीकडे गाडी थांबवतात. कोणीही एकमेकांना ओवरटेक करत नाही कि बाजूला व्हा म्हणून होर्न वाजवत नाही. रुग्णवाहिका जात असल्यास आपणहून रस्ता देतात रुग्णवाहिका ट्रा फिक मध्ये अडकली आहे असे दृश्य मी गेल्या महिन्यात एकदाही पाहिले नाही. खरतर अतिशय आवडावा असा हा परिसर पण भारतामधील मायेचा ओलावा इकडे नाही. येत्या काही दिवसात अजून अनुभव येतील ते क्षणोक्षणी न जमल्यास महिन्यातून एकदा तुमच्यासोबत शेयर करत जाईलच. बाकी सर्व व्यवस्थित काळजी नसावी.


मागील काही दिवसांमध्ये नाताळ च्या सुट्टी निमित्त जर्मनी मधील पर्यटन स्थळांना भेट देण्याचा योग आला. मी ज्या राज्याला भेट दिली ते राज्य मुख्यतः पर्यटना साठीच प्रसिद्ध आहे त्याचे नाव बाडेन वूतेम्बार्ग. या राज्यात सुप्रसिद्ध असे काळे जंगल आहे. येथील झाडे गगनचुंबी आहेत असे म्हणता येईल. बर्फ पडल्यानंतर हे जंगल बहुधा पांढरे होत असावे तो अनुभव येत्या काही दिवसात मिळेल असे वाटते. निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य काय असते ते या काही दिवसात कळाले

या निसर्ग दर्शनाची सुरुवात झाली रेल्वे प्रवासाने काळ्या जंगलात जाणार्या गाड्या विशेष आहेत असे काही नाही परंतु सर्वच गाड्या डबल डेकर असल्यामुळे वरच्या डब्यात बसून प्रवास करण्याची मजा काही औरच. आजूबाजूच्या सर्व निसर्ग किमया चलचित्र यंत्रात कैद करता येतात आणि हे सौंदर्य डोळ्यातही साठवून घेता येते. जाण्याच्या दिवशी रात्र असल्यामुळे आणि इकडे ४:३० वाजताच सूर्यास्त होत असल्यामुळे चलचित्र यंत्राला आराम होता. त्याच्यासाठी कदाचित ती वादळापूर्वीची शांतता असावी. पहिला मुक्काम पडला ओफ्फेन्बार्ग येथे. नाताळ निमित्त खास असणारे ख्रिस्मस मार्केट पाहण्याचा योग आला.
थंडी पासून बचाव करणाऱ्या वस्तू खाण्याच्या विविध पदार्थांचे योग्य प्रकारे मांडलेले ते प्रदर्शनच होते. १ तास या विविध वस्तू पाहण्यात कसा गेला ते कळले नाही. येथील मुख्य आकर्षण होते बर्फावरील स्केटिंग. हाही खेळ बराच वेळ पाहता आला. त्यानंतर आमचा पुढचा टप्पा होता काळ्या जंगलातील सरोवरे पाहण्याचा.

दुसर्या दिवशी सकाळीच ट्रेन पकडून प्रवास  सुरु झाला. इकडच्या ट्रेन अगदी वेळेत धावतात त्यामुळे स्टेशन ज्याला वलन्दि भाषेत बान्होफ म्हणतात तिकडे वेळेत हजर असणे आवश्यक असते. वेळेच्या १० मिनिटे आधी पोचून मशीन वरून तिकीट काढले आणि ट्रेन येताच वरच्या डब्यातली जागा पकडली. कमी लोकसंख्येमुळे काहीही गडबड न होता इकडच्या ट्रेन्स मध्ये ऐसपैस जागा मिळते. पहिला थांबा होता श्च्लू ख झी सरोवराचा. सगळीकडे पसरलेले पाणीच पाणी आणि त्यासोबत बोचणारी थंडी. शून्यापर्यंत पोचलेले तापमान थंडीची जास्तच आठवण करून देत होते. काही काळ येथे थोडी भटकंती केल्यावर स्वारी जंगलात निघाली जंगलात जाणारी एकमेव बस जी घाट चढून जाते आणि आजूबाजूचा परिसर आपण न्याहाळू शकतो. हे सगळे डोळ्यात साठवून आम्ही निघालो फ्रायबर्ग शहराकडे. नाताळाची पूर्वसंध्या असल्यामुळे रस्त्यावर चीट पाखरुही नव्हते. येथील लोक नाताळ आपल्या नातेवाईकांसोबत साजरा करतात त्यामुळे रस्त्यावर सहसा परदेशी नागरिकाच दिसत होते. तेथील चर्च ला भेट देऊन झाल्यानंतर पुन्हा उलटा प्रवास करून आम्ही राहण्याच्या ठिकाणी पोचलो.

दुसर्या दिवशी सकाळीच जर्मनी आणि स्विट्ज़र्लॅंड च्या सीमेवरील गाव कोन्स्टेन्ज़ येथे जाण्यासाठी ट्रेन  मधे बसलो. तिकडे जायला अंदाजे 2 तास लागतात. वातावरण थंड होते ढग आलेले असल्यामुळे थोडे फार धुकेही होते. एका क्षणी असे वाटलेले की आपल्याला काही पाहायला मिळते का नाही, पण काही वेळाने सूर्यदेवांची कृपा झाली आणि आम्ही फेरी चे टिकेट काढून बोटींमधे जाउन बसलो आणि आमचा प्रवास सुरू झाला फ्रेइद्रीच हॅफेन या शहराकडे. हे बंदर आहे आणि ह्या बंदरापासून दक्षिणेकडे पाहिल्यास स्विट्ज़र्लॅंड ची सीमा दिसते येथून आल्प्स पर्वत पाहता येतात. 1-2 तास येथील किनार्यावर घालवुन पुन्हा फेरी मधे बसून आम्ही कोन्स्टेन्ज़ला आलो. आता स्वारी ट्राइबर्ग या शहराकडे निघाली होती. येथे एक धबधबा आहे आणि या ठिकाणी अस्सल ब्लॅक फॉरेस्ट केक खाण्यास मिळतो (भारतात मिळणारा ब्लॅक फॉरेस्ट केक हा अस्सल नाही) ब्लॅक फॉरेस्ट केक हा ब्लॅक फॉरेस्ट मधील झाडापासून तेल काढून बनवला जातो त्यामुळे त्याची चव काही औरच. तेथून निघताना कुकू क्लॉक म्यूज़ीयम पाहिले. जगातील पहिले कुकू क्लॉक येथे तयार झाले आहे ते पाहून आम्ही मुक्कामच्या स्थळी पोचलो तोंडावर अजूनही केक ची चव रेंगाळत होती.

तिसर्या दिवशीच प्रवास ठरलेला होता तो म्हणजे जर्मनी मधील लोकप्रिय शहर स्टूटगार्ट येथे जाण्याचा. ज्या शहरामधे कार्ल बेन्ज़ ह्या गृहस्थाने सर्वप्रथम गाडी तयार करून चालवली तेथे जाउन गाड्यांचे प्रदर्शन पहाणे काही विशेषच! मर्सिडीस च्या म्यूज़ीयम मधे जाउन 16 व्या शतकातील गाड्यांपासून आतापर्यंतच्या गाड्या पाहिल्या आणि भरून पावले. मग पुढे असेच पोर्श या कंपनीचे देखील म्यूज़ीयम पाहिले. आणि स्टूटगार्ट मधील U- Bahn चा देखील अनुभव घेतला भुयारी मार्गाने चालणारी ट्रेन कधी रस्त्यावर येते आणि ट्राम बनते कळत देखील नाही. सर्व काही अगदी विलक्षण आनंद देणारे! अशा रीतीने 3 दिवसांचा हा प्रवास संपला आणि त्या आठवणी आणि फोटो सोबत घेऊन आम्ही पुन्हा परतलो.

बर्‍याच दिवसांपासून लिहिण्यासाठी योग येत नव्हता आज थोडा निवांत वेळ आहे मनात विचारांचे काहूर माजलेले आहे परंतु त्यातून वाट काढून माझे इकडचे अनुभव येत आहेत. सुरूवात करतो म्युनिक ह्या शहरापासून. आज इकडे प्रवासाचा योग होता, योग कसला ठरवून केलेला प्लानच होता तो सर्व सोयी पुर्विपासूनच करून ठेवलेल्या फक्त ब्यागा टाकायच्या आणि भ्रमंती सुरू. फार लवकर प्रवास संपला. सेमी बुलेट ट्रेन चा प्रवास तो लवकर संपायलाच हवा! 400 किलो मीटर चे अंतर हाहा म्हणता 3 तासात पूर्ण झाले. भव्य असे रेलवे स्टेशन, विक्टोरिया टर्मिनस ला सुद्धा लाजवेल असे प्रशस्त 36 प्लॅट फॉर्मस. आम्हाला फक्त 2 च पाहायची सवय. (प्रेरणा नगरचे स्टेशन) ट्रेन फलाटाला लागली. प्रवासात ट्रेनने 250 चा स्पीड सुद्धा पार केलेला होता. काही वेळ कानात त्रास झाला, परंतु नंतर सवय झाली त्याची.

प्रशस्त जागा जागोजागी कचरा टाकण्यासाठी कचरयाचे डबे (शुद्ध मराठीत डस्ट बिन्स) ठेवलेले होते. अर्थातच मेट्रो सिटी असल्यांमुळे इंग्रजी भाषेतूनही सर्वत्र बोर्ड होते. परंतु आता बर्‍यापैकी जर्मन भाषा येत असल्यामुळे हा भाग फिरणे काही अवघड गेले नाही. सोबत मोबाइल आणि अप्लिकेशन होतेच. त्याच्या वापराने माणूस आकखया जर्मनी मधे कुठेही फिरू शकतो. त्यानंतरचा अनुभव होता तो ट्राम मधे बसायचा. (मी राहतो त्या शहरातही आहेत ट्राम पण मोठ्या शहरातील ट्राम मधे बसण्याचा अनुभव काही निराळाच ) अगदी दिलेल्या वेळेत ट्राम स्टॉप वर हजार होती आमचा प्रवास सुरू झाला तो जर्मन म्यूज़ीयम कडे. जगाच्या उत्पत्तिपासून निरनिराळ्या तंत्राचे हे चालते बोलते प्रदर्शन आहे. सहा मजली प्रशस्त इमारतीत असलेले हे प्रदर्शन इतिहासाची आणि टेक्नालजी ची साक्ष देते. पहिल्या मजल्यावर आरमार (नेवी) मधे वापरली गेलेली जहाजे आणि नावा ह्यांच्या प्रतिकृती आहेत आणि प्रत्यक्ष त्या जहाजान्मधे बसल्याची अनुभूती यावी यासाठी म्यूज़ीयम चा हा भाग जहाजाच्या प्रतिकृती मधे बांधण्यात आलेला आहे. याच भागात एलेक्ट्रिकल इंजिनियरिंग मधील शोधांविषयीचा एक भाग आहे येथे विविध उपकरणे ठेवलेली आहेत. जी आपल्याला चालवून पाहता येतात. तळ मजल्यावर खाणी ची प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे. येथे फिरताना प्रत्यक्ष खाणीत फिरल्याचा अनुभव येतो. खाणी मधे वापरली जाणारी विविध उपकरणे येथे नुसती मांडलेलीच नाहीत तर त्यांचा उपयोग कसा होतो हे सुद्धा दाखवलेले आहे. दुसर्या मजल्यावर हवाई उपकरणाचे काही नमुने आणि काही जुनी विमाने ठेवलेली आहेत. तिसर्या मजल्यावर काचेच्या जुन्या वस्तू आणि चिनी मातीपासून बनवलेल्या जुन्या वस्तू आहेत. आणखी वर गेल्यावर विविध धातूंचे प्रदर्शन आहे. सोन्याच्या विटा चांदीचे गोळेही येथे पाहता येतात. सोन्याच्या विटा तयार करण्यासाठी लागणारी सामुग्री सुद्धा येथे आहे. हे सर्व पाहण्यासाठी अंदाजे 5 तास लागतात त्यामुळे उरलेले काही मजले पहाणे राहून गेले कारण म्यूज़ीयम 5 वाजता बंद होते.
आतापर्यंत पोटात कावळे ओरडायला सुरूवात झाली होती, त्यामुळे खाणे आटोपून मोर्चा वळवला MarienPlatzकडे हे म्युनिक शहराचे मध्यवर्ती ठिकाण आहे उन्हाळा असल्यामुळे लोक इकडे खाण्यासाठी येत असतात. इथे काही जुन्या काळातील इमारती आणि काही सिविल इंजिनियरिंग मधील अद्भुत अशा वास्तू आहेत. इकडे रात्री गाण्याच्या मैफिली वगैरे होत असतात.
U-Bahn अर्थातच भुयारी ट्रेन मधे बसण्याचा अनुभव खूप छान होता. भुयारात दोन मजले काढून दोन वेगवेगळ्या मजल्यावरून शहराच्या विविध भागात क्षणार्धात नेऊन सोडणार्या या ट्रेन मुळे म्युनिक मधील पब्लिक ट्रान्सपोर्ट वरचा ताण खूप कमी झालेला आहे. डिसप्ले वरती दिसणारे मार्ग विविध गाड्या त्यांचे पाळले जाणारे टायमिंग पाहून अवाक् व्हायला होते. सर्व कमाल इकडच्या सिविल इंजिनीयर्स ची आहे असे वाटते त्यांना याचे भरपूर श्रेय जाते.
अशा रीतीने दोन महत्वाची ठिकाणे पाहून पहिला दिवस संपला.

आता वळूया दुसर्या दिवसा कडे. तुम्ही सर्वांनी लहानपणी कधी ना कधीतरी वॉल्ट डिज़्नी चे कार्टून्स पाहिलेलेच असतील त्यामधे सुरुवातीलाच दाखवण्यात येणारा कॅसल आठवतो का हो तुम्हाला?
त्या कॅसल ची मूळ कल्पना ज्या कॅसल वरुन घेण्यात आलेली आहे तिकडे दुसर्या दिवशी जाणार होतो. नेहमीप्रमाणे प्रशस्त आणि स्वछ अशा रेलवे स्थानकावरून प्रवास सुरू झाला हा भाग आल्प्स पर्वतांच्या अगदी जवळ आहे त्यामुळे जातानाच आल्प्स पर्वतांचे जागोजागी दर्शन होत होते. 2 तासाच्या प्रवासानंतर ईच्छित स्थळी पोचलो. 18 व्या शतकात बांधल्या गेलेल्या या राजवाड्याचे वैशिष्ट्य म्हणजे याचे स्थापत्य. हा राजवाडा जरी राजस्थानी महाला सारखा नसला तरी त्याचे योग्य प्रकारे जतन करण्यात आलेले आहे. राजवाड्या तील प्रत्येक भिंत ही वेगवेगळ्या प्रसंगांची साक्ष देते त्यावर काढलेली चित्रे विविध प्रसंगांची साक्षीदार आहेत या राजवाड्या मागे दोन दर्या जोडणारा पूल आहे त्याचे नाव  Marienbrucke ह्या पुलावरून काढलेला कॅसल चा फोटो अप्रतिम आहे. येथून कॅसल अतिशय सुंदर आणि नयनरम्य दिसतो येथेच अजुन एक कॅसल आणि अल्पेन सी नावाचे एक सरोवर आहे विश्रामासाठी पेशवे ज्या प्रमाणे पर्वतीला जायचे त्या प्रमाणे राजा लूड्विग या सरोवराच्या ठिकाणी बहुदा येत असावा. येथून होणारे आल्प्स पर्वत रांगांचे दर्शन डोळ्यांचे पारणे फेडुन टाकतात. ह्या कॅसल च्या आठवणीत प्रवासाचा दुसरा दिवस संपला.

प्रवासाचा पुढचा दिवस सुखद अनुभव देणारा होता, कारण बर्‍याच दिवसांनतर उन पडले होते आणि वातावरणही उत्तम होते आजचा दिवस थोडा धाडसाचा होता कारण आल्प्स पर्वत रांगा पाहायला जाणे म्हणजे विशिष्ट उंचीवर जावे लागणार होते. उंचीची तशी पहिल्यापासूनच भीती. अहो दुसर्या मजल्यावरून खाली वाकून पाहायला मला भीती वाटते इथे तर 2000 मीटर उंच पर्वतवरून खाली पहावे लागणार होते, पण ही संधी मला दवडायची नव्हती, त्यामुळे धीर केला आणि ट्रेन मधे बसलो. 1 तासात आम्ही पोचलो आल्प्स पर्वतांच्या पायथ्याशी. तेथून कॉगवील ट्रेन आपल्याला पर्वतावर घेऊन जाते. तशा केबल कार सुद्धा आहेत परंतु त्या काही काळ बंद आहेत त्यामुळे ट्रेन मधे बसलो आणि 1 तासाचा दीर्घ प्रवास सुरू झाला. या प्रवासात ट्रेन 2000 मीटर एवढे उंच अंतर चढत जाते यामधे सुद्धा जर्मन स्थापत्य इंजिनीयर्सची कमाल आहे 4.8 किलो मीटर एवढे अंतर आल्प्स चा पर्वत फोडून त्यामधे.बोगदा तयार करून ट्रेन साठी रुळ टाकण्यात आलेले आहेत हे अंतर आणि चढ इतका आहे की 4.8 किलो मीटर चे अंतर पार करण्यास 35 मिनिटे लागतात सहसा हे अंतर साध्या रस्त्यावर 4 मिनिटात कापले जाते हा प्रवास करून माणूस जेव्हा वरती पोचतो तेव्हा त्याला नंदनवनात आल्याचा भास होतो. सर्वत्र बर्फ आणि बर्फात खेळणारे लोक आणि त्यानंतर दक्षिणेला पाहिल्यास सर्वत्र आल्प्स चे पर्वत. हे होते 1900 मीटर चे अंतर. अजुन 200 मीटर वर जाण्यासाठी केबल कार आहे तेथून माणूस अशा ठिकाणी पोचतो जिथे खाली थंड बर्फ आणि वरती डोके गरम करणारा सूर्य. परंतु आल्प्स पर्वतांचे दर्शन ह्या सर्व गोष्टी विसरायला भाग पाडते. हे जर्मनी मधील सर्वात उंच पर्वत आहे त्याचे नाव Zugspitze. येथे काही गिर्यारोहकांनी मिळून सोन्याचा रॉड रोवून ठेवलेला आहे तेथून आल्प्स पर्वतांची मागील बाजू (पुढील बाजू स्विट्ज़र्लॅंड मधे आहे) आणि Eibsee नावाचे सरोवर दिसते. निसर्गाची अवकृपा आपण सध्या अनुभवत आहोत पण निसर्गाची कृपा आपल्याला येथे अनुभवण्यास मिळते. या ठिकाणी खेळण्यासाठी बाइक्स आहेत लहान मुलांपासून सर्व लोक या बाइक वर बसून स्लाइड करण्याचा आनंद घेतात. येथे खाण्याची सर्व सोय आहे. हे ठिकाण माणसाला जग विसरायला लावते. आणि माणूस आपसूकच या जागेच्या प्रेमात पडतो. 4-5 तास इथे कसे निघून जातात ते कळत देखील नाही आणि मग परत उलटा प्रवास सुरू होतो येताना सुद्धा ट्रेन अतिशय सुंदर आणि विहन्गम अशी दृश्‍ये दाखवत आपणास खाली घेऊन येते. आणि येताना आपल्यासोबत असतात त्या आठवणी आणि एक निर्धार तो म्हणजे पुन्हा येथे नक्की यायचा. या विचारताच प्रवास सुरू होतो आणि म्युनिक केव्हा येते हे कळत सुद्धा नाही आणि इथे एक प्रवास जो आपल्याला 3-4 दिवस आयुष्यातील सर्व गोष्टी विसरायला शिकवतो त्याची अखेर होते.

तुमचा,

अभिजीत

Show Comments