ePrivacy and GPDR Cookie Consent Script by Cookie Consent

माझे जर्मनी मधील अनुभव! - संकेत कुलकर्णी

माझे जर्मनी मधील अनुभव! - संकेत कुलकर्णी

वर्ष २००८, मे महिना, शाळेला सुट्टी! मस्त पैकी क्रिकेट खेळून, त्यानंतर आमरस ओरपून वामकुक्षीचा बेत होता. डोळ्यात झोप रेंगाळत असताना पु. ल. देशपांडे यांचे प्रवासवर्णनांचे पुस्तक हाती पडले. युद्धात राखरांगोळी झालेल्या बॉन शहराचे पुलंनी केलेले वर्णन वाचून कुतूहल चाळवले आणि मी पूर्ण पुस्तक वाचून संपवले. जर्मनी सोबत असलेल्या माझ्या आकर्षणाची ती फक्त सुरुवात होती!

२०११ साली जेव्हा मला जर्मनी ला जायची संधी मिळाली, तेव्हा स्वर्ग फक्त २ बोटे वर उरला होता. आयुष्यामध्ये त्याआधी फक्त एकदा विमानात बसलो होतो. आकाशाचा वेध घेणाऱ्या पक्षाचे चिन्ह असेलेले लुफ्थांसा चे विमान त्यामुळे मी कधीच विसरणार नाही. जर्मनी च्या उत्तरेला असलेले sankt पीटर ओर्डीन्ग या गावी मी माझी अ२ चा अभ्यासक्रम मी ५ देशातील विदयार्थ्यंसोबत पूर्ण केला. त्या २१ दिवसात आम्ही हॅम्बुर्ग शहराला २ वेळा भेट दिली. तेथील ४ ४ मजली शॉपिंग मॉल्स आणि हॅम्बुर्ग बंदर बघून थक्क झालो. जर्मन भाषेची गोडी निर्माण झाल्यामुळे मी पुढे शक्य असेल तेव्हा भाषा शिकायचा प्रयत्न केला.

कालौघात मी पुढे सनदी लेखापाल CA अभ्यासक्रम करून पुढे २ ३ वर्ष नोकरी केली. त्यानंतर मला परदेशात शिक्षणाचे वेध लागले होते. इतर बहुतेक सर्व ठिकाणी नकार मिळत असताना, जर्मनी मधील फ्रांकफुर्त स्कूल ऑफ फिनान्स या विद्यापीठाने माझ्याशी संपर्क साधला आणि भेटायला बोलावले. ज्या अभ्यासक्रमामध्ये मला स्वारस्य होते, त्यात मला प्रवेश बिलकुल मिळणार नाही याची ग्वाही त्यांनी दिली, आणि दुसऱ्या अभ्यासक्रमासाठी प्रयन्त करण्याचा सल्ला दिला. नशिबात बहुतेक हाच पत्ता लिहिला असल्यामुळे दुसऱ्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळाला. (बोचरा) स्पष्टवक्तेपणा हा जर्मन गुण त्या प्रसंगी प्रकर्षाने जाणवला. परत पुस्तकांवरची धूळ झटकत"इश्श बिन, दु बिस्ट" ची उजळणी चालू केली. सर्व सोपस्कार पूर्ण करून मी शेवटी ऑगस्ट २०१९ मध्ये माझ्या आवडीच्या देशात परत पाऊल ठेवले!

कामचलाऊ जर्मन येत असल्यामुळे मला थोडा अधिक आत्मविश्वास होता. फ्रांकफुर्त विमानतळावर टॅक्सी केली आणि त्यातील ड्राइवर "इंडीचे लॉयते, सेहर क्लूग" बोलत होता, ज्यात त्याने थोडा रस्ता चुकवला . ४९  युरो बिल झाले आणि पाकिटातून ५० युरो ची  नोट काढत असताना आपण"इंडीचे"(भारतीय) आहोत पण"क्लूग" (बुद्धिमान ) नाही याची तात्कळ जाणीव झाली! स्वतःच्या खोलीचा ताबा घेऊन मी कपडे वगरे लावले. माझ्या फ्लॅट मध्ये माझ्या सोबत अजून ८ लोक होती आणि माझ्या आधी फक्त एक मोरक्कन मुलगा आलेला होता, जो पुढे चा चांगला मित्र झाला. त्यामुळे इतर ७ कोण असणार याची मला प्रचंड उत्कंठा होती. एक एक करून विद्यार्थी येत होते. शेवटी आम्ही 4 भारतीय, १ मोरक्कन, एक पेरुव्हियन, १ इटालियन, १ जर्मन आणि १ चिनी असे एकूण ९ झालो.

मी स्वैपाकमध्ये यथातथाच, पण प्रयोगशील होतो किंवा आहे. जर्मनी मध्ये मी एकदा दोनदा पोळ्या करायचा प्रयन्त केला, पण तो पूर्ण फसला. पनीर करायचा प्रयत्न मात्र  यशस्वी झाला. कुकर च्या शिट्ट्यामुळे सोबतचे अभारतीय लोक सुरुवातीला कावरेबावरे व्हायचे. पण हळूहळू त्यांना सुद्धा सवय झाली. एकाच वेळेला ३ कुकर परिसर दणाणून सोडायचे. एका बाबतीत मात्र माझा अंदाज पूर्ण चुकला, ते म्हणजे दप्तरदिरंगाई! आमचा डिशवॉशर बदलायला २ महिने का लागले याचे उत्तर मला बहुतेक पुढच्याच जन्मात मिळेल. सुरुवातीचे १ २ महिने अभ्यासाचा फारसा ताण नसल्यामुळे मी सुरुवातीला स्वैपाक शिकण्याकढे आणि जर्मन शिकण्याकढे लक्ष दिले.

हळूहळू अभ्यासाचा ताण आणि इतर लोकांसोबत प्रोजेक्ट चे काम वाढायला लागले. आमच्या युनिव्हर्सिटी मधील वातावरण बरेच आंतरराष्ट्रीय आहे. इतर देशामधील लोकांसोबत काम करण्याची आणि वेगवेगळ्या इव्हेंट्स ला जायची मी कुठचीही संधी सोडली नाही. दक्षिण अमेरिकन, जर्मन, इतर युरोपियन, चिनी विद्यार्थी कशा प्रकारे विचार करतात त्यातून खूप शिकायला मिळते. त्यांची स्वयंशिस्त आणि चिकाटी मला माझ्या अंगात बाणवायला   नक्कीच आवडेल. विशेषतः चिनी जर्मन भाषा शिकण्यावर जी मेहनत आणि पैसे खर्च करतात ते बघून माझे डोळे दिपले. स्थानिक भाषेला आपण सतत दुय्यम स्थान देऊ नये असे माझे स्वतः चे मत आहे. जर्मन भाषेचे महत्व वर्कस्तूडेन्ट नोकरीचे अर्ज करताना खूप जाणवले. स्थानिक लोकांची विचारपद्धती समजण्यासाठी आणि एकूण समाजात मिसळण्यासाठी उत्तम जर्मन समजणे आणि बोलता येणे फार गरजेचे आहे. माझ्या युनिव्हर्सिटी मध्ये आम्हाला जर्मन शिकवतात आणि त्यांची पद्धत भारतीय शिक्षकांपेक्षा पुष्कळ वेगळी आहे. एकंदरीतच इकडे शिकवण्याची पद्धत भारतापेक्षा वेगळी आहे. वर्गातील छापील पुस्तक आणि प्रत्यक्ष कामाची सांगड घालत शिकवायची पद्धत मला खूप भावली. विध्यार्थ्यांच्या प्रश्नाचे निरसन करायचा ते पूर्ण प्रयत्न करतात. बहुतेक सर्व शिक्षकांनी आधी वेगवेगळ्या ठिकाणी उच्च पदावर काम केले असल्याचे प्रतिबिंब त्यांच्या शिकवण्या मध्ये नक्कीच पडते.

या सर्वांच्या मध्ये मी सतत नोकरीचे अर्ज करत होतो. महिन्याच्या शेवटी पगाराची सवय लागली असल्यामुळे मला लवकरात लवकर अर्धवेळ का होईना काम चालू करायचे होते. शेवटी ३० ४० ठिकाणी नकार आल्यानंतर मला डिसेंबर सुरुवातीला एका ठिकाणी होकार आला. माझे काम जानेवारी २०२० च्या शेवटाला चालू होणार होते. मी डिसेंबर महिन्यात भारतामध्ये परत आलो आणि जवळसपास एक महिना राहून जर्मनीला परतलो, आणि काम चालू केले. तेव्हा कोरोनाचे वादळ घोघावयाला सुरुवात झाली होती!

फेब्रुवारीच्या सुरवातीला कोणी खोकले की मान लगेच वळायची आणि खोकणाऱ्या माणसाचा शोध घ्यायला लागायची. नोकरी च्या ठिकाणी सुद्धा आम्ही पूर्ण काळजी घेऊ, तसेच तुम्ही घरी राहून काम करू शकता असा पर्याय दिला होता. काही भारतीय प्रसारमाध्यमांनी जर्मनीचे नाव घेऊन इटलीच्या बातम्या दिल्या आणि शेवटी त्यातील सत्य समजल्यानंतर आई बाबा शांत झाले. साधारण जून महिन्यापर्यंत कोरोना नियंत्रणामध्ये आलेला होता. आणि माझी उन्हाळयाची मे महिन्यानंतर चालू झाली. माझा जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्या मध्ये मी पूर्ण वेळ काम केले.

या तीन महिन्या मध्ये मी भरपूर फिरलो. हायडेलबर्ग या शहरापासून माझी फिरण्याची सुरुवात झाली. त्या नंतर मारबर्ग, फुलदा, कासेल, माइन्झ अशा अनेक ठिकाणी जाऊन आलो. एखादे चर्च, सुंदर राजवाडा, त्यामधील म्युसियम, नदी, कॅफे अशी साधारण माझी टुमदार जर्मन गावाची कल्पना आहे. जर्मनी सोबत मी बेल्जियम आणि फ्रान्स मध्ये सुद्धा फिरलो. जवळपास पाऊण तासाची"रिव्हर टूर" ची कल्पना मला अतिशय आवडली. या सर्व गावांमध्ये बहुतेक सर्व महत्वाच्या वास्तू नदीच्या काठावर असतात. 3 भाषांमध्ये (जर्मन, फ्रेंच, इंग्लिश) कुठचाही रटाळपणा येणार नाही याची काळजी घेत त्या त्या गावाचा इतिहास ऐकण्याची मजा आगळीवेगळी आहे.
   
सप्टेंबर च्या सुरुवातीला परत कॉलेज चालू झाले. सध्या कोरोनाची दुसरी लाट आहे आणि लॉक डाउन सुद्धा चालू झाले आहे. नाताळच्या आसपास हे लॉक डाउन संपलेले असेल अशी अपेक्षा आहे. जर्मनी आणि युरोप मध्ये मी फिरायची माझी खूप इच्छा आहे!    

Show Comments